Breaking News

मानवतेच्या पुजार्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

शांती, क्षमा, दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध, ज्ञानशील, ईश्वरी पुरुष या प्रत्येक शब्दाशी तंतोतंत जुळणारे विनम्रशील व्यक्तिमत्त्व म्हणजे पद्मश्री डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी. 14 मे हा आप्पासाहेबांचा जन्मदिन. समाजप्रेमाची, भक्ती सामर्थ्याची गंगा ज्यांच्या अंगणात अवतरली आणि ज्यांच्या निस्सिम कर्तृत्वाचा नंदादीप चंद्र-सूर्य असेपर्यंत सातासमुद्रापार प्रज्वलित राहील असा करुणेचा महामेरू, समाज जीवनाचा आधारू आणि धर्माधिकारी घराण्याच्या उज्ज्वल समाजकार्याची पताका आसमंती फडकवणार्‍या श्री. आप्पासाहेबांना जन्मदिवसानिमित्त विनम्र दंडवत.

नानासाहेब धर्माधिकारी यांचे आप्पासाहेब हे ज्येष्ठ पुत्र आहेत. आपल्या वडिलांच्या आध्यात्मिक कार्याचा वसा समर्थपणे जोपासतानाच त्यांनी मानवता धर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं आणि त्यांच्या पावलांनी तयार झालेली वाट लोकजीवनात नव्या जाणिवांची पहाट घेऊन आली. या घराण्यातील पूर्वज श्री. गोविंद चिंतामणी शांडिल्य यांनी मानवता धर्माविषयी जनजागृतीचं कार्य केल्याबद्दल पश्चिम किनारपट्टीचे तत्कालीन राज्यकर्ते सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या घराण्याला धर्माधिकारी ही पदवी बहाल केली. या घराण्याला पुढे हेच आडनाव धारण करण्याची राजाज्ञा झाली. नानासाहेबांनी 75 वर्षांपूर्वी समाजप्रबोधनाला सुरुवात केली. मरगळलेल्या समाजाला नवचैत्यन्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी देव, देश आणि धर्म या गोष्टींची स्वदेव, स्वदेश आणि स्वधर्म अशा नव्या स्वरूपात मांडणी केली. 1942 मध्ये श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून एक-एक मनुष्य घडवण्यास सुरुवात केली. समर्थांच्या श्रीमद् दासबोधाचा आधार घेत नानासाहेबांनी रायगड जिल्ह्यात आध्यात्मिक, प्रासादिक निरुपणाचा यज्ञ उभारला. समाजात पसरलेले अज्ञान, अंधश्रद्धा, कुविचार, कुप्रथांची या यज्ञात आहुती दिली. संत शिकवणीतून समाजजीवनात ज्ञानज्योत प्रज्वलित केली.

अखंड अविरत सुरू असलेला हा वाक्यज्ञ म्हणजेच आज सार्‍या जगभर सर्वदूर पसरलेल्या श्री समर्थ बैठका. या श्री समर्थ बैठकांना जाऊन संत शिकवण अंगिकारणारे लाखो-करोडो श्रीसदस्य त्यांच्या कुटुंबासह उत्तम प्रकारे संसार प्रपंच करत असताना दिसत आहेत. श्री. नानासाहेबांच्या कार्याने प्रेरित होऊन श्री. आप्पासाहेबांनी हे समाजकार्याचे शिवधनुष्य उचललं आणि ते सामर्थ्यानं सांभाळलं सुद्धा. नानासाहेबांनी लावलेल्या मानवतारूपी रोपट्याचं जतन करण्याचं काम श्री आप्पसाहेबांनी केलं. आज या मानवतारूपी वृक्षाचं समाजप्रबोधनपर वृक्षात रूपांतर झालं आहे. नानासाहेबांनी रुजवलेली परंपरेची शिकवण आप्पासाहेबांनी जाणीवपूर्वक जोपासली. समाज आणि देशप्रेमाविषयी जागृती निर्माण करणार्‍या आप्पासाहेबांनी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. प्रत्येकाला नैतिकता, निर्भयता आणि नम्रतेची शिकवण दिली. मातृदेवो भवः पितृदेवो भवः आचार्यदेवो भवः आतिथीदेवो भवः ही शिकवण देऊन प्रत्येकावर असलेल्या समाजऋणाची आणि देशऋणाची जाणीव करून दिली. देशसेवेसाठी, राष्ट्र उभारणीसाठी सतत तयार राहायला हवं, अशीही शिकवण आप्पासाहेबांनी दिली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना आप्पासाहेबांनी केली. या प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण भारतभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.(संकलित)

रोह्यात श्रीसदस्यांचे स्वच्छता अभियान

रोहे ः प्रतिनिधी : स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने रविवारी (दि. 12) रोह्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांनी संपूर्ण रोहा शहर स्वच्छ केले.

रविवारी सकाळी 8 वाजता शहरातील डॉ. सी. डी. देशमुख शहर सभागृहापासून स्वच्छता अभियानास सुरुवात झाली. त्यात हातात झाडू, फावडा, कायता, घमेले घेऊन श्रीसदस्य सहभागी झाले. या वेळी रोहा शहारतील प्रमुख 11 रस्ते, बस स्थानक, 15 सरकारी कार्यालये, रोहा व निडी रेल्वे स्थानक, रोहा अष्टमी पूल या ठिकाणी जाऊन श्रीसदस्यांनी तेथील संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

या अभियानामध्ये 889 श्रीसदस्य, 34 सरकारी अधिकारी व कर्मचारी, तसेच 31 इतर मान्यवर सहभागी झाले होते. या वेळी 34 टन कचरा गोळा करून तो नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला.

माणगावात स्वच्छता मोहीम

माणगाव : प्रतिनिधी : पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त  रविवारी (दि. 12) सकाळी 7 ते 11 या वेळेत श्रीसदस्यांनी माणगाव नगरपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान राबविले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानात 1099 श्रीसदस्य सहभागी झाले होते. त्यांनी माणगावातील 20 शासकीय कार्यालये, तसेच हद्दीतील मुंबई-गोवा महामार्ग, शहरातील कचेरी रोड, खांदाड मार्ग, जुने माणगाव मार्ग, मोर्बा रोड, निजामपूर रोड, बामणोली रोड, एस. एस. निकम इंग्लिश स्कूल मार्ग आदी रस्त्यांची साफसफाई करून 22.8 टन सुका कचरा गोळा केला. कचरा उचलण्याकरिता एकूण 16 ट्रॅक्टर लावण्यात आले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply