कर्जतमध्ये ‘भूली हुई यादे’ पुस्तकाचे प्रकाशन
कर्जत : प्रतिनिधी
सध्या संगणकीय युगात सारे काही सोपे झाले आहे. मात्र मागच्या पिढीतील माणसांनी कसा संघर्ष केला, त्यांना किती मेहनत करावी लागली, किती खस्ता खाव्या लागल्या हे आपण लिहिलेल्या अनुभवावरून कळेल. त्यामुळे आपण लिहीत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांनी येथे केले. सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे यांच्या विषयी त्यांच्या मित्रांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी लिहिलेले अनुभव सुभाषचंद्र नातू यांनी संकलित करून ’भूली हुई यादे’ पुस्तक तयार केले. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यात पुंडलिक पाटील बोलत होते. इतिहासच पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. रेल्वे प्रवासी संघटनेचे विजय हरिश्चंद्रे 20 वर्षे सचिव होते. यावरून त्यांच्या कामाचा आवाका आपल्या लक्षात येईल, असे पुंडलिक पाटील म्हणाले. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. माजी नगरसेवक निलेश हरिश्चंद्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुभाषचंद्र नातू यांनी प्रास्ताविकात समारंभाचा उद्देश सांगितला. नगराध्यक्ष जोशी यांनी ’हरिश्चंद्रे आणि अनंतकाका जोशी यांची मैत्री कशी होती? ते सांगून हरिश्चंद्रे यांची कामाची पद्धत व पाठपुराव्याचा पिच्छा सांगितला. माजी नगराध्यक्ष राजेश लाड, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपक बेहरे, प्रभाकर करंजकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. हरिश्चंद्रे यांना मनोगत व्यक्त करताना भावना अनावर झाल्या. जागतिक दर्जाचे चित्रकार पराग बोरसे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, ज्योती जाधव, मुद्रक मंदार दगडे, सुभाषचंद्र नातू आदींचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास चित्ते यांनी केले.सुधाकर आंबवणे, प्रसाद पाटील, शिरीष ताम्हाणे, रमेश भागवत, श्याम शिंदाडकर, शिवसेवक गुप्ता यांच्यासह हरिश्चंद्रे कुटुंबीय व नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.