Breaking News

घोटवडे पूल बनला धोकादायक!

आमदार रविशेठ पाटील यांनी केली पाहणी

पाली ः प्रतिनिधी

रोज मरे त्याला कोण रडे, या प्रचलित म्हणीचा प्रत्यय सुधागड तालुक्यातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या पुलांना पाहून येतोय. येथील वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला परळी घोटवडे पूल मागील अनेक वर्षांपासून मोडकळीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा धोकादायक पूल अखेरची घटका मोजत आहे. घोटवडे पूल जुना व जर्जर झाला असून मध्यभागी वाकलेला पूल केव्हाही तुटून जीवघेणा अपघात घडेल, अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे. पावसाळा तोंडावर आल्याने पूल कोसळण्याचे संकेत मिळू लागलेत. याबरोबरच पुलाला संरक्षण कठडे नसल्याने वाहने नदीत कोसळून जीवघेणे अपघात घडण्याची भीती वाढली आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी घोटवडे पुलाची पाहणी केल्यानंतर पुलाची धोकादायक अवस्था पाहून चिंता व्यक्त केली. परळी, पाली, खोपोली आदी बाजारपेठा व शाळा, रुग्णालये येथे जाण्यासाठी घोटवडे पूल महत्त्वाचा मानला जातो. याबरोबरच येथील घोटवडे गाव, घोटवडे बौद्धवाडी, घोटवडे आदिवासीवाडी, पेंढरमाळ, गाठेमाळ, जाधणी गाव, तांबट माळ ठाकूरवाडी अशा साधारणतः 3000 लोकवस्ती असलेल्या सभोवतालच्या अनेक गावांना व आदिवासी वाड्यापाड्यांना जोडणार्‍या एकमेव घोटवडे पुलाची दुरुस्ती व्हावी याकरिता सातत्याने प्रशासन स्तरावर आवाज उठविला जात आहे. घोटवडे पुलाची बाब कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आमदार रविशेठ पाटील यांनी या पुलाची तातडीने पाहणी केली. या वेळी घोटवडे पुलाच्या दुरवस्थेबाबत आमदार रविशेठ पाटील यांनी चिंता व्यक्त केली. लॉकडाऊननंतर घोटवडे पुलाच्या कामाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आमदार रविशेठ पाटील यांनी आश्वासित केले आहे.

नवीन पूल बांधण्याची मागणी

सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी पुलाच्या धोकादायक स्थितीचा अंदाज घेऊन पूल वाहतुकीस बंद केला होता, मात्र आजघडीला या पुलावरून सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण मिळत आहे. येथील स्थानिक जीव मुठीत घेऊन पुलावरून ये-जा करतात. अनेक वर्षांपासून तग धरून असलेला घोटवडेचा जुना पूल जमीनदोस्त करून नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply