कर्जत : बातमीदार : नेरळ ग्रामपंचायतचे ब्रिटीशकालीन धरण दगड, माती आणि प्लास्टिक कचर्यात हरवून गेले होते. सदर धरणाची स्वच्छता करण्याची मागणी नेरळमधील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतने धरणाचा दरवाजा उघडून अस्वच्छ पाणी सोडून दिले. त्यावेळी मासे पकडण्यासाठी मासेमारी करणार्यांनी गर्दी केली.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग लगत असलेल्या नेरळ येथील धरणाच्या पाण्यामध्ये गावातील गौरी गणपतींचे विसर्जन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षापासून गाळ काढण्यात आला नसल्याने अर्धे धरण पावसाळ्यात पाण्यासोबत वाहून येणार्या दगड, मातीने भरले आहे, त्याचबरोबर धरणातील पाण्यात प्लास्टिक कचरा साठला होता. त्यामुळे नेरळ गावातील नागरिकांनी धरणातील गाळ काढण्याची मागणी केली होती. उपसरपंच अंकुश शेळके, ग्रामपंचायत सदस्य राजेश मिरकुटे यांच्या उपस्थितीत नेरळ ग्रामपंचायतच्या कर्मचार्यांनी या धरणाचे दरवाजे उघडून सर्व पाणी सोडून दिले.
गाळ काढण्यासाठी शनिवारी संध्याकाळी ग्रामपंचायतच्या ब्रिटीशकालीन धरणातील पाणी सोडण्यात आले. धरणातील माती सुकण्यासाठी किमान आठवडा लागणार आहे. त्यानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने माती, दगड बाहेर काढण्यात येतील. पावसाळा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल, हे लक्षात घेऊन मे अखेरपर्यन्त नेरळ धरण गाळमुक्त करणार येईल.
-जान्हवी साळुंखे, सरपंच, नेरळ