Breaking News

महाडमध्ये गाळे रिकामे, दुकाने थाटली रस्त्यावर; वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास

महाड : प्रतिनिधी

योग्य नियोजनाअभावी महाड बाजारपेठेत होणार्‍या वाहतूक कोंडीने नागरिक आणि येणार्‍या पर्यटकांना त्रास होत आहे. शहरातील दुकानदार तसेच भाजी व फळ विक्रेते आपला माल नाल्यावर आणि त्याच्याही पुढे रस्त्यावर आणून ठेवत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होवून पादचार्‍यांनाही त्रास होताना दिसत आहे. महाड शहराला सर्वात मोठी बाजारपेठ लाभली आहे. तालुक्यासह शेजारील पोलादपूर, माणगाव, मंडणगड, म्हसळा आणि गोरेगाव तालुक्यतील ग्राहकेही खरेदीसाठी महाड येथे येत असतात. शिवाय महाड हे ऐतिहासिक शहर असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक, शिवप्रेमी, भीमसैनिक दाखल होत असतात. गेल्या अनेक वर्षात शहराचा विस्तारदेखील वाढू लागल्याने लोकसंख्येतही वाढ झाली आहे. मात्र मुख्य बाजारपेठेचे रुंदीकरण झालेले नाही. यामुळे या बाजारपेठेत अवजड वाहन शिरताच अन्य वाहनांना अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच अनेक दुकानदार आपला माल आणि विक्रीला आलेले सामान रस्त्यावर किंवा गटरावर लावून ठेवत असल्याने पादचार्‍यांना त्रासदायक ठरत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते भगवानदास बेकरी मार्ग, पिंपळपार ते थेट जुने पोस्ट ऑफीस तसेच   अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी कायम दिसून येत आहे. शहरातील विविध ठिकाणी जोडमार्गांवर भाजी विक्रेत्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यातच हातगाड्यांचा मोठा वावर आहे. रस्त्यांचे कोपरे फळ विक्रेत्यांनी पकडले आहेत. तर गाळे भाड्याने घेवूनदेखील गाळे रिकामे ठेवून दिवसभर काही भाजी विक्रेते स्पर्धा लावून रस्त्यांवर बसत आहेत. जोरजोरात ओरडून ग्राहक आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दिवसभर सुरु राहते.  यामध्ये सर्वसामान्य माणसाचे हाल होताना दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानदास बेकरी यादरम्यान असलेल्या भाजी विक्रेत्यांनी तर बिनदिक्कत रस्त्यावर ठाण मांडले आहे. सध्या या मार्गावरून दापोली, मंडणगड, खेडकडे जाणार्‍या आणि त्या ठिकाणांहून मुंबईकडे येणार्‍या वाहनांची वर्दळ असते. यामध्ये बसेसचादेखील समावेश आहे. या विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी चौक ते राजमाता जिजाऊ गार्डनपर्यंतदेखील पदपथ शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी लागणार्‍या रिक्षादेखील अनेक वेळा या विक्रेत्यांच्या पुढे रस्त्यावरच उभ्या असतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोलीस वाहतूक शाखेचे केंद्र तर महाड नगरपालिकेचे प्रशासकीय भवन आहे, मात्र रस्त्यातील भाजीवाल्यांचे अडथळे, दुकानांचा माल याकडे पालिका आणि पोलीस कर्मचारी डोळेझाक करत असल्याने या विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. वाहतूक आणि शहर विकासाचे नियोजन नसल्याने ही अवस्था दिसून येत आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply