अलिबाग : प्रतिनिधी
आक्षी येथील आद्य शिलालेखाचे नुकतेच रायगड जिल्हा परिषदेमार्फत संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आले. त्या वेळी शिलालेख परिसरात लावण्यात आलेल्या माहिती फलकांच्या मजकूरातील अनेक त्रूटी समोर आल्या आहेत. त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे.
आक्षी येथील मराठीतील आद्य शिलालेख कित्येक वर्ष दुर्लक्षीत अवस्थेत पडून होता. रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेत या शिलालेखाचे संवर्धन आणि सुशोभीकरण केले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले, मात्र सुशोभीकरणानंतर शिलालेखाच्या परिसरात लावण्यात आलेल्या दोन माहिती फलकांच्या मजकूरात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
दोन्ही शिलालेखात साल आणि शक यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही शिलालेखांपैकी आद्य शिलालेख कोणता याचे स्पष्टीकरण होत नाही. शिलालेखांच्या मागे लावण्यात आलेल्या मजकुरावर तशी ठळक नोंद घेऊन उल्लेख करणे गरजेचे आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आद्यशिलालेखा मागे लावलेला मजकूर हा दुसर्या शिलालेखातील आहे. आणि गध्देगाळ शिलालेखामागे लावलेला मजकूर हा आद्य शिलालेखाचा आहे. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दुसर्या शिलालेखा संदर्भातील मजकूरातून चार ओळी लावलेल्या फलकातून गाळून टाकण्यात आल्या आहे. ज्यांच्या उल्लेख शं. गो. तुळपुळे यांच्या प्राचिन कोरीव लेख या पुस्तकात उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या ओळींचा समावेश या ठिकाणी करणे शक्य होणार आहे. जेणे करून याठिकाणी येणार्या भाषा अभ्यासकांना आणि पर्यटकांना शिलालेखाचा अर्थ कळू शकेल. त्यामुळे शिलालेखांच्या सुशोभीकरणा निमित्ताने बसविण्यात आलेल्या माहिती फलकांच्या मजकुरात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी इतिहास अभ्यासकांनी केली आहे.
दोन्ही शिलालेखांचे संवर्धन झाले, ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र सुशोभीकरणादरम्यान लावण्यात आलेल्या फलकांमध्ये अनेक त्रुटी आणि चुका आहेत. त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात सविस्तर तक्रार केली आहे. प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल घेऊन उचित कार्यवाही करावी. -हर्षला अनंत महाजन, मराठी भाषा अभ्यासक, नागाव, ता. अलिबाग