Breaking News

ऐतिहासिक वारसा टिकविण्याची जबाबदारी सर्वांची

अपर जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

उरण ः रामप्रहर वृत्त

आपल्या जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वारसा असलेली स्मारके, विविध स्थळे आहेत. या ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांनी नुकतेच घारापुरी-एलिफंटा येथे केले. जागतिक वारसा सप्ताहाच्यानिमित्ताने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नुकतेच जागतिक वारसा स्थळ एलिफंटा लेणी घारापुरी येथे या सप्ताहाच्या उद्घाटनपर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, मुंबई सर्कल डॉ.राजेंद्र यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनिता राणे-कोठारे, पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, एलिफंटाचे सरपंच बळीराम ठाकूर, माजी सरपंच राजेंद्र पडते यांची प्रमुख उपस्थिती होती. अपर जिल्हाधिकारी अमोल यादव पुढे म्हणाले की, जागतिक वारसा सप्ताहाचा उद्देश प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आपल्या वारसांचे जतन करणे हा आहे. रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, महाड तालुक्यातील चवदार तळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, घारापुरी येथील शैवलेणी-एलिफंटा लेणी यासारख्या इतर अनमोल अशा ऐतिहासिक स्थळांचा, स्मारकांचा वारसा टिकविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी सर्व ऐतिहासिक स्मारकांच्या, स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, तेथे कोणत्याही प्रकारची विद्रूपता न करणे, तेथील पावित्र्य राखणे, हे सर्वांचेच कर्तव्य आहे. या कर्तव्याप्रति कटिबद्ध होऊया. प्रा. डॉ. अनिता राणे-कोठारे म्हणाल्या की, मुंबई शहर हे सात बेटे आणि 66 द्वीप यांनी मिळून बनले आहे. भारतातील दोन तृतीयांश लेण्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहेत. वारा-पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी प्राचीन काळापासून भिक्षू या लेण्यांचा आसरा घेत असत. एलिफंटा लेणी ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झाली आहे. एलिफंटाचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी आपल्या मनोगतात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागासोबत करीत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. तर एलिफंटाचे माजी सरपंच राजेंद्र पडते यांनी एलिफंटा लेणीबद्दलचे आपल्या जुन्या अनुभवांचे कथन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ, मुंबई सर्कल डॉ. राजेंद्र यादव प्रास्ताविकात म्हणाले की, घारापूरी येथील जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून सर्वांना परिचित आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी मोठे योगदान दिले आहे. जवळपास 2 हजार वर्षांपासून आयकॉनिक व सार्वत्रिक मूल्य असलेले हे स्थळ जगात एकमेव असून दुसरी एलिफंटा लेणी होणे शक्य नाही. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ए.एस.ए. डॉ.नागणूर यांनी केले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply