अलिबाग : प्रतिनिधी
मागील चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. पावसाने रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 14) एकूण पर्जन्यमानाच्या 101.77 टक्के पावसाची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
रायगड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. 1 जूनपासून 14 सप्टेंबरपर्यंत सरासरी तीन हजार 273.25 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण पर्जन्यमानाच्या 101.77 टक्के पाऊस पडला आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यांचा अपवाद सोडला तर इतर सर्व तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 655 मि. मी. पाऊस पडतो. यंदा जूनमध्ये 523 मि. मी. पावसाची नोंद झाली. जूलै महिन्यात जिल्ह्यामध्ये साधारणपणे 1206 मि. मी. पाऊस होतो. यंदा जुलैमध्ये 1008 मि. मी. पावसाची नोंद झाली. सलग दोन महिने सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यात कमी पाऊस नोंदविला गेला होता, पण ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले. जून आणि जुलै महिन्याची कसर पावसाने ऑगस्ट महिन्यात भरून काढली आहे.
जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्याचे पर्जन्यमान 874 मि. मी. आहे. यंदा ऑगस्टमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला. त्यामुळे रायगडकरांना दिलासा मिळाला. सप्टेंबर महिन्याच्या 12 तारखेलाच पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडला असल्याने लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली सर्व धरणे जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरली आहे. भातशेतीदेखील चांगली आहे.
Check Also
नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …
RamPrahar – The Panvel Daily Paper