नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील बरेच नेते आमच्या संपर्कात असून लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाला चालना दिली जाणार आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते विजय नाहटा यांनी ऐरोली येथील आपल्या भाषणात दिली. ऐरोली येथील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानात सोमवारी (दि. 28) बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकार्यांना पद नियुक्ती पत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी नुसते पद घेऊन बसायचे नसून जनतेत मिसळून लोकांची कामे करायची आहेत. प्रत्येक पदाधिकारी हा जनतेच्या कामात दिसला पाहिजे. प्रत्येक महिन्याला पदाधिकार्यांची एक सभा बोलावली जाणार असून कामाचा अहवाल घेतला जाणार आहे. पुढील काळात पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ दिले जाणार असून संघटना नवीन असली तरी कार्यकर्ते जुनेच आहेत त्यांना काम करण्याची पद्धत माहीत आहे. येत्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश आला तर युतीच्या माध्यमातून निवडणूक लढू अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढण्याचीही आमची तयारी असल्याचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी आपल्या भाषणात सांगितले. नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात एकूण सातशेच्या वर कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली असून त्यात उपजिल्हा प्रमुखांपासून शाखा प्रमुखांपर्यंत, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, महिला प्रमुख, युवा सेना प्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, उत्तरभारतीय सेना, बंजारा सेने, माजी सैनिक सेना, अशा विविध आघाड्यांच्या प्रमुखांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख विजय चौगुले, माजी महापौर अशोक गावडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले. व्यासपीठावर संपर्क प्रमुख किशोर पाटकर, उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, रामाशेठ वाघमारे, जगदीश गवते, आकाश मढवी, विलास भोईर, बहादूर बिष्ट, चंद्रकांत आगोंडे, अजित सावंत, दीपक सिंग, गणपत शेलार, सुरेश सपकाळ, कमलेश वर्मा,महिला जिल्हा संघटिक सरोजताई पाटील, शहर संघटिक शीतल कचरे इत्यादी उपस्थित होते.