Breaking News

जिल्ह्यात 30 ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या संवेदनशील; निवडणूकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 18)  मतदान होणार आहे. त्यापैकी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील 30 ग्रामपंचायतींमध्ये चुरशीची निवडणूक होणार असून त्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. निवडणुकीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून 2400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 310 शस्त्रे जाम करण्यात आली आहेत.  जिल्ह्यात 1700 पोलीस अधिकारी व कर्मचारी  बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाध घार्गे यांनी ही माहिती शुक्रवारी (दि. 16) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.  अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या वेळी उपस्थित होते. रविवारी रायगड जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या 190 पैकी 164 ग्रामपंचायती रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील आहेत. त्यापैकी 30 ग्रामपंचातींमध्ये चुरशीच्या निवडणुका होणार आहेत. त्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील 164 ग्रामपंचायतींमधील 507 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी 127 पोलीस अधिकारी, 806 पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाचे तीन पथक, त्यात 100 जवान, गृहरक्षक दलाचे 500 जवान, दंगल नियंत्रण पथकांमध्ये 90 पोलीस अंमलदार, शिघ्रकृती दल पथकात 14 जवान असे 1700 पोलीस व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. कर्जत, महाड , श्रीवर्धन येथे पोलीस दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत. पेण व माणगाव येथे दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. ग्रामपंचातींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी 49 तर पोलीस ठाण्यांमधील प्रभारींनी 228 गावभेटी देऊन तेथील जनतेशी संवाद साधला. 30 ठिकाणी पोलीस संचलन करण्यात आले. 310 शस्त्र ताब्यात घेण्यात आली. 2400 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, अशी माहिती, पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली.

अमली पदार्थ विरोधात मोहीम राबवणार

रायगड जिल्ह्यात मोठा समुद्र किनारा आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यात तरुणवर्ग जास्त  असतो. त्यामुळे या परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती आहे. अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांविरोधात मोहीम राबविण्यात येणार आहे. अमली पदार्थ विकणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या वेळी सांगितले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply