Breaking News

रायगडात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची

कर्जतमध्ये सरपंच पदासाठी सहा ठिकाणी तिरंगी तर एका ग्रामपंचायतीत सरळ लढत

कर्जत : प्रतिनिधी

तालुक्यातील सात ग्रामपंचायतीमध्ये रविवारी  मतदान होणार आहे. या सात ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या 69 जागांपैकी 14 सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याने आता 55 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी सात ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठी 20 उमेदवारांनी मतदारांना कौल लावला असून, त्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये सरळ तर सहा ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढती होत आहेत. कर्जत तालुक्यातील कोंदिवडे, मांडवणे, उकरूळ, वेणगाव, वावळोली, कळंब आणि दहिवली तर्फे वरेडी या सात ग्रामपंचायतींमध्ये 18 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. थेट सरपंच निवडणूक ही राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हावर होत नसल्याने स्थानिक आघाड्यांचे राजकारण या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे. सात ग्रामपंचायतमधील सदस्य पदाच्या 69 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती, मात्र त्यातील तीन ग्रामपंचायतीमधील 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 55 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र खरी चुरस थेट सरपंच पदांच्या निवडणुकीत दिसत असून सात ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच पदाच्या सात जागांसाठी तब्बल 20 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातील सहा ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत होत असून एका ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे वर्चस्व राहावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शेकाप, भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या वावळोली ग्रुपग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी माजी सरपंच बाळू पुंडलिक थोरवे यांच्या समोर एकनाथ गणपत भगत यांनी आव्हान उभे केले आहे. कोंदिवडे ग्रुपग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे, आमदार महेंद्र थोरवे यांची ही ग्रामपंचायत आहे. सरपंच पदासाठी प्रमोद विश्वनाथ देशमुख, तानाजी बाबू पाटील आणि शालन बबन शेलार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. मांडवणे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद सर्वसाधारण महिला यासाठी राखीव असून तेथे पुष्पा पंढरीनाथ आगज, नीता नामदेव गायकवाड आणि रंजना बाळकृष्ण सावंत यांच्यात तिरंगी लढत होत आहे. उकरूळ ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून तेथे विद्यमान सरपंच वंदना संतोष थोरवे तसेच निर्मला योगेश थोरवे आणि कोमल गणेश खडे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. वेणगाव ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच पद  नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव असून तेथे सारिका सुनील आंग्रे, अश्विनी मंगेश पालकर आणि सीमा सुभाष पालकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. कळंब ग्रुपग्रामपंचायतीचे थेट सरपंच नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव असून तेथे माजी सरपंच प्रमोद कोंडिलकर तसेच अरुण नामदेव बदे आणि रामचंद्र पांडुरंग बदे यांच्यात तिरंगा लढत होत आहे. दहिवली तर्फे वरेडीमधील सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव असून त्या ठिकाणी वर्षा विष्णू कालेकर, नेत्रा निलेश तरे आणि मेघा अमर मिसाळ यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

पोलादपुरातील सात ग्रामपंचायतींमध्ये मतदानाची जय्यत तयारी

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील 16 पैकी नऊ ग्रामपंचायती बिनविरोध  झाल्यानंतर उर्वरित सात ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी (दि.18) मतदान होऊ घातले आहे. उमरठ ग्रामपंचायत बिनविरोध जाहीर झाली आहे तर नऊ सदस्य बिनविरोध झालेल्या लोहारे ग्रामपंचायतीमध्ये फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. उर्वरित भोगाव खुर्द, बोरघर, चांभारगणी बुद्रुक, दिविल, कालवली, कापडे खुर्द या ग्रामपंचायतींमध्येदेखील निवडणूक रंगतदार होणार असून सर्वत्र महाविकास आघाडी आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट), तसेच काही ठिकाणी भाजप आणि शेकापचे  उमेदवारदेखील भवितव्य आजमावित असल्याने या लढती रंगतदार होणार आहेत.

कालवली ग्रामपंचायत : पोलादपूर तालुक्यातील कालवली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी शेकापचे योगेश महाडीक आणि   किरण पवार यांच्या लढत होत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मधून प्रियंका पार्टे, सविता भोसले आणि गणपत शिंदे हे बिनविरोध निवडून आले असून प्रभाग 2 मध्ये दीपक कळंबे, रंजना सकपाळ, बाबाराम महाडीक आणि समिक्षा सकपाळ हे दोन सदस्यपदांसाठी लढत देत आहेत. प्रभाग 3 मध्ये महामूद तिवडेकर आणि बेगम वलीले हे दोन उमेदवार बिनविरोध जाहीर झाले आहेत.

दिविल ग्रामपंचायत : दिविल ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी   गोपाळ चांढविकर आणि सागर देवे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. प्रभाग 1 मधील तीन जागांसाठी रूपाली पवार, मंगेश जंगम, प्रमोद मोरे, मनिषा शिंदे, सविता सोनावणे, रंजना देवे, सुवर्णा भिलारे, राजश्री देवे आदी 8 उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 2 मधील दोन जागांसाठी विक्रम भिलारे, सविता कदम, पुष्पा जाधव, कृष्णा मोरे, सरिता थिटे, नामदेव भिलारे आदी सहा उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग 3 मधील दोन जागांसाठी श्रध्दा चौधरी, राजू जंगम, अनिता भिलारे, नयन सुतार, रत्ना भिलारे आदी पाच उमेदवार नशीब आजमावीत आहेत.

लोहारे ग्रामपंचायत : लोहारे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात हालचाली सुरू होऊन सरपंच पदासाठी  दीपक पवार आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी प्रभाग 1 मध्ये प्रतिभा सुर्वे, परशूराम नरे, श्रीकांत निकम, प्रभाग 2 मध्ये हरिश्चंद्र मांढरे, मनिषा साळवे, नारायण शेडगे, प्रभाग 3 मध्ये चंदा पवार, सुषमा पवार संदेश नरे आदी नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, समीर साळुंखे यांनी अचानक सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून बिनविरोध ग्रामपंचायतीच्या सूराला बेसूर करून टाकले. तथापि लोहारे ग्रामपंचायतीचे सर्व नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

भोगाव खुर्द ग्रामपंचायत : महिला प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव असलेल्या भोगाव खुर्द ग्रामपंचायतीमध्ये प्रियंका कदम, प्रतिभा शेलार, ज्योती कदम आणि सीमा चिकणे यांच्यामध्ये थेट सरपंच पदासाठी चौरंगी लढत होणार आहे. तर ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता प्रभाग 1 मधील दोन जागांसाठी सुजाता कदम, निता निकम आणि अरूणा कदम यांच्यात तिरंगी होणार असून तिसर्‍या सदस्यपदासाठी सूर्यकांत कदम बिनविरोध निवडून आले. प्रभाग 2 मधील एका जागेसाठी कुंदा चिकणे विरूध्द सीमा चिकणे अशी थेट लढत होणार असून विष्णू काळप हे बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग 3मध्ये भारती पार्टे विरूध्द कविता नलावडे यांच्यात लढत होणार असून लहू पवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.

धामणदिवी ग्रामपंचायत : धामणदिवी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनिकेत वाडकर विरूध्द क्षमता बांद्रे अशी थेट लढत होत आहे. तर सदस्य पदासाठी प्रभाग 1 मध्ये स्वप्नाली जाधव, वर्षा वाडकर, आर्या उफाळे, रंजना चव्हाण, अनिकेत वाडकर, नथूराम जाधव, प्रभाग 2 मध्ये भारती जाधव, करूणा बांद्रे यांच्यामध्ये लढत होणार असून रामदास कदम यांची दुसर्‍या जागेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग 3 मध्ये रामभाऊ रांगडे आणि प्रिया भावे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

चांभारगणी बुद्रुक ग्रामपंचायत : चांभारगणी बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी सतीश गोळे आणि तानाजी पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत होणार आहे. सदस्य पदासाठी प्रभाग 1 मधील तीन जागांसाठी अनिता शिंदे, पुष्पा सोंडकर, अजय मुजुमले, सहदेव येरापले, शांताराम गोळे, राजेश कोंद्रे हे सहा उमेदवार रिंगणामध्ये आहेत. प्रभाग 2 मधील तीन जागांसाठी मंदा बर्गे, मनिषा सलागरे, शैला तळेकर, द्रौपदी घोलप, गणेश तळेकर, सुधीर पार्टे हे सहा उमेदवार लढत देणार आहेत तर प्रभाग 3 मधील तीन जागांवर वैशाली पवार, सारिका जाधव आणि पांडूरंग दळवी हे बिनविरोध निवडून आले आहेत.

बोरघर ग्रामपंचायत : अनुसूचित जमातीचे आरक्षण असलेल्या बोरघर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी बंडू विठू पारधी आणि सुनील गायकवाड यांच्यात थेट लढत होत आहे. सदस्य पदासाठी प्रभाग 1 मध्ये मनिषा पारधी, अंजना मोरे, नामदेव पार्टे, चंदू पार्टे हे चार उमेदवार दोन जागांसाठी रिंगणात आहेत तर प्रभाग 2 मधील तीन जागांसाठी गीता गोगावले, अनिता तांबे, चंद्रभागा सणस, सुनंदा आंबले, निवृत्ती कदम आणि सचिन कदम असे सहा उमेदवार लढत देत आहेत. प्रभाग 3 मधील दोन जागांसाठी इंदूबाई उलालकर, चंद्राबाई उलालकर, नारायण उतेकर आणि कृष्णा गोगावले हे उमेदवार उभे आहेत.

उमरठ ग्रामपंचायत : उमरठ ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला उमेदवार न मिळाल्याने सरपंच पद रिक्त राहिले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या  सात जागा आहेत. त्यापैकी संजय कळंबे, सावित्रीबाई कळंबे, रूपाली कळंबे, इंद्रजित कळंबे, संगिता खोराणे आणि जयराम मोरे या सहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर एका जागा रिक्त राहिली आहे.

रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 12 उमेदवार

रोहे : प्रतिनिधी

तालुक्यात तळवली तर्फे अष्टमी, खैरे खुर्द, पुई, पहूर व दापोली या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी  होत असून तेथील थेट सरपंच पदाच्या एकूण पाच जागांसाठी 12 उमेदवारांनी मतदारांना कौल लावला आहे. थेट सरपंच पदासाठी रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी, पुई, आणि दापोली या ग्रामपंचायतींमध्ये दुहेरी तर खैरे खुर्द आणि पहुर ग्रामपंचायतींमध्ये तिहेरी लढत होणार आहे. निवडणुका होत असलेल्या रोहा तालुक्यात पाच ग्रामपंचायतीधील सदस्य पदाच्या एकूण 37 जागांसाठी 67 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी बारा, खैरे खुर्द ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी तेरा, तसेच पुई, पहूर आणि दापोली ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी सात जागांसाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या पाचही ग्रामपंचायतीमधील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, उमेदवार मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेताना दिसत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply