मविआविरोधात आक्रमक पवित्रा
मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यात महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांवरून वाद सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यामुळेच शनिवारी
(दि. 17) भाजपतर्फे ’माफी मांगो’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी ही घोषणा केली. खासदार संजय राऊत यांना आंबेडकरांची दोन पुस्तकं भेट दिली आहे, राऊतांनी ती वाचावी आणि इतिहास समजून घ्यावा, असे शेलार यांनी म्हटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असा उल्लेख गुरुवारी संजय राऊत यांनी केला होता. या वक्तव्यावरून शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे म्हणत शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले ते तरी उद्धवजींच्या सेनेला मान्य आहे का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला. संजय राऊतांना सामनात सर्व काही उद्धवजींमुळेच मिळालं. एवढे होऊनही त्यांनी साधी माफी मागायची तसदी घेतली नाही. ज्या बाबासाहेबांना काँग्रेसने पाडले त्याच काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे गेले.
बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने सुरु आहे. तो जाणीवपूर्वक सुरू असून, त्यामागील कारणं अस्पष्ट आहेत. एखादं संकट आल्यावर शेतकर्याला ते अस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो. तसा आंबेडकरप्रेमी, समस्त भारतीय नागरिकांवर आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करीत अफगाणी संकट आणले आहे, अशी टीका या वेळी त्यांनी केली.
महामानवाविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य उद्धव ठाकरे कसे मान्य करू शकतात, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शेलार यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीकडून वारंवार महापुरूषांबाबत
आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात येत आहेत. या विरोधात भाजप मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार आहे. जागोजागी ’उद्धवजी माफी मागा, नाना पटोले माफी मागा, अजित पवार माफी मागा’ हे आंदोलन करण्यात येणार आहे. काळे झेंडे दाखवत महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार?
शेलार यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावरही हल्ला चढवला. शेलार यांनी पुढे म्हटले की, काल परवा उद्धवजींच्या सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचीही वक्तव्य समोर येत आहेत. त्यात हिंदु देवदेवता आणि संताची चेष्ठा तसेच अपमान केला जात आहेत. हा महाराष्ट्राचा द्रोह नाही का? उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार असाही प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.