नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गाव-खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्याने ग्रामीण शिक्षणात प्रचंड प्रगती झाली. ग्रामीण शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये कर्मवीरांचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि अखंड प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन भारताचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी शुक्रवारी (दि. 16) वाशी येथे केले. ते कृतज्ञता सप्ताहाच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त 6 ते 12 डिसेंबरदरम्यान विविध स्पर्धा, उपक्रम यांचा समावेश असलेला कृतज्ञता सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या रायगड विभागस्तरीय सप्ताहाचा सांगता समारंभ वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर बोलत होते. हा समारंभ ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्क्षतेखाली आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला.
अणुशास्त्रज्ञ डॉ. काकोडकर पुढे म्हणाले की, देशाकडे भरपूर पैसा असला म्हणजे देश पुढारलेला होत नाही, तर देश पुढे जाण्यासाठी देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे. त्यासाठी देशातील युवकांनी नाविन्यपूर्ण संशोधनाकडे लक्ष दिले पाहिजे.
संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीतील खासदार शरद पवार यांच्या योगदानाविषयी भाष्य केले. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचा 82वा जन्मदिन आणि त्यांच्या रयत शिक्षण संस्थेतील प्रवेशाला या वर्षी 50 वर्षे झाली त्याबद्दल हा कृतज्ञता सप्ताह आयोजित केल्याचे डॉ. पाटील सांगितले.
संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सर्व समावेशक भूमिकेचा व शिक्षणक्षेत्रातील कार्याचा गौरव केला.
या समारंभास ‘रयत’चे रायगड विभाग चेअरमन आमदार बाळाराम पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष पी. जे. पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, जनरल बॉडी सदस्य जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख, महेंद्र घरत, दशरथ भगत, रायगड विभागातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य व कृतज्ञता सप्ताह समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आबासाहेब सरवदे व माया कळविकट्टे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या प्राचार्य डॉ. शुभदा नायक यांनी मानले. कृतज्ञता सप्ताहात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
Check Also
पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …