मुरूड : राजपुरी ग्रुप ग्रामपंचायतची तहकूब ग्रामसभा सरपंच हिरकणी गिदी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात घेण्यात आली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी समाजसेवक गणेश मोन्नाक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गणेश मोन्नाक 2008 ते 2017 पर्यंत तंटामुक्ती समितीचे सदस्य, तर 2018 पासून उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी सागर रक्षक दलात सदस्य, ग्रामीण पाणीपुरवठा समिती अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
तंटामुक्त अध्यक्षपदी मधुकर गायकर
नागोठणे : विभागातील पाटणसई ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी झाली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी मधुकर गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच माधवी गायकर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या या सभेला रोहे पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर, उपसरपंच पिंगळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच नागरिक उपस्थित होते.
मुरूडमध्ये हिंदी दिवस
मुरूड : येथील अंजुमन इस्लाम वरिष्ठ महाविद्यालयात नुकताच हिंदी दिवस साजरा करण्यात आला. हिंदी ही देशातील विविध भाषांना जोडणारी भाषा असल्याचे मत या वेळी प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. या वेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे घेण्यात आलेल्या हिंदी कविता लेखन स्पर्धेत 63 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे मूल्यांकन प्रा. शोएब खान व प्रा. अंजुम दाखवे यांनी केले. स्पर्धेच्या पहिल्या गटात तनझील उलडे, झैनाब कादरी, मुस्कान दरोगे यांनी, तर दुसर्या गटात निलीमा दिवेकर, झैबुन्निसा उलडे आणि मरियम जहांगीर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.
चिकणी आदिवासीवाडीच्या रस्त्याचे भूमिपूजन
नागोठणे : जिल्हा नियोजन अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास निधीतून राष्ट्रीय महामार्ग ते चिकणी आदिवासीवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. या वेळी कडसुरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र शिंदे, माजी पंचायत समिती सदस्या अमिता शिंदे, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सचिन कळसकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कब्रस्तानच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन
नागोठणे : माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून नागोठणे येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान सुशोभीकरणाच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला असून, त्याचे भूमिपूजन पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि नागोठणे गटाच्या माजी जि.प. सदस्या कौसल्या पाटील यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाले. नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, भाजपचे रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, आनंद लाड, सिराज पानसरे, शब्बीर पानसरे, रऊफ कडवेकर, सचिन मोदी, कीर्तिकुमार कळस, बाळू रटाटे, शेखर गोळे आदींसह नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंकिता ठोंबरे पैठणीच्या मानकरी
नागोठणे : प्रतिनिधी
साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त येथील ज्वाला ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेत खडकआळीतील अंकिता ठोंबरे यांनी प्रथम क्रमांक मिळवत पैठणीच्या मानकरी ठरल्या. अंकिता ठोंबरे या तोरणा इंग्लिश मीडियम शाळेच्या कर्मचारी असून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला तोरणा शाळेचे अध्यक्ष प्रकाश मोरे, संचालिका प्रणिता मोरे, तसेच माधुरी जगताप, अल्फा परमार, पल्लवी सावंत, ज्योती मालुसरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.