पनवेल : वार्ताहर
नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने उरण परिसरातील 23 बेरोजगार तरुणांकडून 52 लाख 70 हजार रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याशिवाय या भामट्याने टेम्पो व चारचाकी वाहन भाड्याने लावण्याचे आमिष दाखवूनसुद्धा अनेक वाहनमालकांना लाखोंचा गंडा घातला आहे.
संतोष अनंत पेढवी असे या भामट्याचे नाव असून आर्थिक गुन्हे शाखेने या भामट्याविरोधात उरण पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. संतोष पेढवी हा उरण तालुक्यातील केगावमध्ये रहाण्यास असून तो नेव्हल आर्मामेंट डेपोमध्ये संतोष ट्रॅव्हल्स नावाने कॉन्ट्रक्टवर बसेस चालवत होता. त्यामुळे त्याची नेव्हीतील काही अधिकार्यांसोबत ओळख होती. याचाच फायदा उचलत त्याने बेरोजगार तरुणांना हेरून नेव्हीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये अथवा कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याची तोंडी जाहिरातबाजी केली होती, तसेच त्याने टेम्पो व फोर व्हीलर गाडी भाड्याने लावून देण्याचे आश्वासन देऊनसुद्धा अनेकांकडून त्यांची वाहने आपल्याकडे घेतली होती. अनेक बेरोजगार तरुणांनी या भामट्याला नेव्हीमधील नोकरीसाठी लाखो रुपये दिले होते. त्याशिवाय या भामट्याकडे अनेक व्यक्तींनी आपले टेम्पो आणि फोर व्हिलर कार भाड्याने लावण्यासाठी दिल्या. नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन महिना उलटल्यानंतर बेरोजगार तरुणांनी त्याच्या कार्यालयात खेटे मारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली, मात्र काही तरुणांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने कार्यालय बंद करून पलायन केले. या प्रकरणात फसवणूक झालेल्या 23 बेरोजगार तरुणांनी एकत्र येऊन नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने भामट्या संतोष पेढवी याच्यावर फसवणुकीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.