राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पनवेल : वार्ताहर
राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई करीत मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलजवळील खारघर कोपरा गावाच्या हद्दीतून जाणार्या सायन-पनवेल द्रुतगती मार्ग क्रमांक 1वर एक ट्र्क अडवून त्याच्याद्वारे अवैध मद्याचा साठा 76,77,840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या दारूची आवक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्याच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय पुरळकर, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, शिवाजी गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष जाधव, जवान विलास चव्हाण, महिला जवान रमा कांबळे आदींच्या पथकाने सापळा रचला होता. येथे असलेल्या पथकर वसुली नाक्याच्या पुढील बाजूस संशयित ट्रक (जीजे – 06 – बीटी – 9717) यास अडवून त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित रॉयल ब्लु व्हिस्कीच्या बाटल्या असे एकूण अवैध गोवा मद्याचे 898 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी ट्रक चालक संदीप पंडित (वय 38) व समाधान धर्माधिकारी (वय 30) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. व त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आल्या.
अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हाट्सअप क्रमांक 8622001133 तसेच फोन नंबर – 022 -2263881 वर संपर्क साधावा.
-कीर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रायगड विभाग