Breaking News

कोरोनाचे नियम पाळून बल्लाळेश्वराचा माघी जन्मोत्सव

पाली तहसील कार्यालयात नियोजन बैठक

पाली : प्रतिनिधी

कोरोनाचे नियम पाळून येत्या 15 फेब्रुवारीला पालीतील बल्लाळेश्वराचा माघी जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र या वेळी यात्रा आणि काही उपक्रम होणार नाहीत.

माघी गणेशोत्सवासंदर्भात पाली (सुधागड) तहसील कार्यालयात नुकतीच प्रशासन, पोलीस व बल्लाळेश्वर देवस्थान विश्वस्त आणि पदाधिकार्‍यांची नियोजन बैठक  झाली. या वेळी माघी महोत्सवाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालीतील माघी महोत्सवामधील यात्रा आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यावर्षी यात्रा अथवा रस्त्यावर दुकाने लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. त्याचप्रमाणे जन्म सोहळ्याच्या कीर्तनास फक्त मोजके भाविक उपस्थित राहतील. श्री गणेशाची पालखी मिरवणूकदेखील गाजावाजा न करता साधेपणाने गाडीतून निघेल. पालखी रस्त्यात कोठेही थांबणार नसून भाविकांनी पालखीस फक्त नमस्कार करावा. तसेच महाप्रसादही होणार नाही, अशी माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी या बैठकीत दिली.

देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप म्हणाले की, यावर्षी माघी गणेशोत्सवला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून, तो कोरोनाचे नियम व अटी शर्थी पाळून 16 तारखेपर्यंत चालणार आहे. 

या नियोजन बैठकीस पोलीस निरीक्षक विजय तायडे, बल्लाळेश्वर देवस्थानचे विश्वस्त राहुल मराठे, विनय मराठे, सचिन साठे तसेच शेखर सोमण, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी महेश घबाडी, नगरपंचायत कर्मचारी रोशन जोशी यांच्यासह आरोग्य व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply