Breaking News

अमली पदार्थ तस्करीला आळा घालणार -भारंबे

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, सायबर तसेच अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. त्याशिवाय पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीवर भर देण्याचे त्यांनी संकेत दिले.
21 व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवी मुंबई शहरात अलीकडच्या काळात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अशातच नवी मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदी मिलिंद भारंबे रूजू झाले आहेत. 1998च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले मिलिंद भारंबे यांनी आपल्या अडीच दशकाच्या कारकिर्दीत मिळालेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे. अत्यंत मितभाषी असलेले भारंबे यांना पोलिस दलातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने उद्भवणार्‍या विविध समस्या सोडवण्याचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलाला त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत काहीकाळ गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या होत्या, मात्र तो अपवाद वगळता शहरात पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील हत्या, बलात्कार विनयभंग, चोरी घरफोडी, वाहनचोरी त्याचप्रमाणे सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, अंमली पदार्थाची वाढती तस्करी, वेगवेगळ्या प्रकराचे बेकायदे धंदे वाढले आहेत. पण नवी मुंबई शहराला सुरक्षित व शांत ठेवण्यासाठी अधिक प्राधान्य देणार आहे.
अमली पदार्थासंबंधीचे कायदे खूप आव्हानात्मक आहेत. कुणीतरी सांगितले म्हणून कुणालाही पकडता येत नाही. त्यांच्याजवळ अमली पदार्थ सापडणे आवश्यक आहे, तरच त्याच्या विरोधात कारवाई करता येते. त्यामुळे बहुतेक गुह्यात मोठे पुरवठादार हाती लागत नाहीत. जोपर्यंत काही पुरावे सापडत नाहीत, तोपर्यंत त्याला पकडू शकत नाही. नवी मुंबई शहरातील अमली पदार्थ पुरवठा करणार्‍या तस्करांची साखळी खंडीत केली तरच अमली पदार्थांचा पुरवठा करणारे मोठे तस्कर हाती लागतील.
नवी मुंबई शहरातील वाहतुकीचा व पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाढते अवैध धंदे, सायबर गुह्यांचे व अमली पदार्थाच्या तस्करीचे वाढते प्रमाण पाहता या गुह्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे. तसेच आगामी काळात होणार्‍या नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे, असेही मत मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केले.

सायबर गुह्यांचे मुख्य आव्हान
सायबर गुन्हे उघडकीस आणणे मोठे आव्हान असून सायबर गुन्हेगारांची राजस्थान, हरियाना, बिहार, झारखंड, यूपी, ओरिसा या राज्यात गावेच्या गावे आहेत. यातील अनेक गावे ही दुर्गम भागात आहेत. त्या भागात जाऊन सायबर गुन्हेगारांना पकडणे मोठे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे सायबर क्राईम खूप महत्त्वाचा विषय असून या गुह्यांचा तपास करण्याबरोबरच अशा प्रकारचे गुन्हे घडू नयेत, यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहे.

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply