नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
देशात कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नवी मुंबई महानगरपालिकेने याबाबत खबरदारी घेतली आहे. मागील आठवडाभरात शून्यावर आलेली करोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. या आठवड्यात सलग तीन दिवस कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरीकांनीही न घाबरता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नुकतीच अतिरिक्त कार्यभार असणारे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आरोग्य विभागाची तातडीने बैठक घेत महापालिकेच्या वतीने केल्या जाणार्या दैनंदिन करोना चाचण्या आणि लसीकरण याविषयाचा आढावा घेत कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे शहरात करोनाच्या चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली. चीनमध्ये ओ मायक्रॉनच्या ‘बीएफ 7’ या उपप्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले असताना भारतातही याबाबतही काळजी घेतली जात असून नवी मुंबई महापालिकेने बंद केलेली चाचणी केंद्र पुन्हा सुरू केली असून आठवडाभरात रुग्णसंख्या वाढ होत आहे. डिसेंबर 23,24,25,या तीन दिवस करोनाचा प्रत्येकी एक करोना रुग्ण सापडला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात दैनंदिन 500 हून अधिक आरटी-पीसीआर टेस्टींग व 600 हून अधिक न्टीजन टेस्टीग केल्या जात असताना या टेस्टींगमध्येही वाढ करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढवण्यात आलेल्या आहेत. यासोबतच कोविड लसीकरणाकडेही विशेष लक्ष देत महापालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याचे
निर्देश आयुक्तांनी दिले. दरम्यान, कोरोनाचा धोका अद्याप पूर्ण टळलेला नाही हे लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
चाचण्यांना सुरुवात
सध्या महापालिकेची रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र याप्रमाणेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार्या एपीएमसी मार्केट, रेल्वे स्टेशन्स याठिकाणीही कोरोना चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. करोना रुग्ण संख्या आठवडाभरात वाढत असल्याचे दिसत आहे. सलग तीन दिवस प्रत्येकी एक रुग्णवाढ झाली आहे, परंतू पालिका या स्थितीवर लक्ष असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.