Breaking News

शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची खालापूर येथे बैठक

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक नुकतीच सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर येथील प्रगतशील शेतकरी नारायण बाळकृष्ण जगताप यांच्या शेतावर घेण्यात आली. प्रत्येक तालुका कृषी कार्यालयात स्थापन झालेल्या मार्गदर्शन केंद्राचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. भगत यांनी या वेळी केले.

शेतकर्‍यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शेतीत कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, गांडूळ शेती, मत्स्यपालन, फलोत्पादन अशा पूरक व्यवसायाची जोड देऊन त्यातून मिळणारे दुय्यम घटक वाया न घालवता त्याचे चक्रीकरण करून उत्पादन व उत्पन्न वाढवणारी एकात्मिक शेती पद्धती अवलंबण्याची गरज आहे, असे मत डॉ. एस. बी. भगत यांनी या वेळी व्यक्त केले.

कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगून शेतकरी – शास्त्रज्ञ मंचाचे समन्वयक डॉ. रवींद्र मर्दाने यांनी ग्राम बीजोत्पादन, एक गाव, एक वाण, गटशेती व यांत्रिकीकरणाचे महत्त्व शेतकर्‍यांना सोदाहरण पटवून दिले. कनिष्ठ उद्यानविद्यवेत्ता डॉ. नामदेव म्हसकर यांनी कंदपिकाची माहिती दिली. कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. हेमंत पवार यांनी फळपिके, भाजीपाला यावरील रोग तसेच अमरवेल व वाळवी निर्मूलन उपाययोजनांची माहिती देत शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन केले. 

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष गजानन दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेमध्ये मंचाचे सदस्य सर्वश्री मच्छिंद्र पारठे, सुभाष मुंढे, अविराज बुरुमकर, पुंडलिक लोते, अविनाश आमले, प्रभाकर पाटील, बळीराम देशमुख, जिजाबाई लबडे, राजश्री सावंत, शोभना पडवळे, लक्ष्मण जाधव, परशुराम पाटील आदींनी सहभाग नोंदविला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply