Breaking News

आचार्य जांभेकरांच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार -ना. रवींद्र चव्हाण

दर्पण पुरस्कारांचे पत्रकारांना वितरण

पोलादपूर ः प्रतिनिधी

पत्रकारितेद्वारे ठाम मत मांडण्याची परंपरा दर्पणने सुरू केली. बाळशास्त्रींनी दर्पण मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीला आरसा दाखवला, तेच काम पत्रकारितेत आजही सुरू आहे. त्यामुळेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या पोंभुर्ले गावी सुधारणा करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील दर्पण पुरस्कारांचे वितरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे व कुडाळ येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील ’दर्पण’ सभागृहात झाले. त्या वेळी मंत्री चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, माजी सरपंच सादिक डोंगरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, सुधाकर जांभेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखीचे स्वागत, दर्पण स्मारकातील बाळशास्त्रींच्या अर्धपुतळयास अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. समारंभाच्या निमित्ताने ’दर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्यानंतर सन 2022च्या प्रतिष्ठेच्या दर्पण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार कोकण विभाग शैलेश पालकर (पोलादपूर) यांना प्रदान करण्यात आला. या वेळी आमदार नितेश राणे यांनी, पत्रकारिता आणि राजकारण यांचा जवळचा संबंध आहे. बाळशास्त्रींचे नाव जगभरात जावे, आपल्या राज्यासह देशभरातील पत्रकार पोंभुर्ले येथे यावेत या दृष्टीने येथील स्मारकाचा व गावाचा विकास करण्यासाठी आपण स्वत: शासनामध्ये पाठपुरावा करु, असे स्पष्ट केले. पद्मश्री परशुराम गंगावणे म्हणाले, पत्रकार नेहमीच अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करीत असतात. पत्रकारांनी मागे वळून न पाहता असेच पुढे चालत रहावे. पत्रकारांच्या कार्याचा गौरव करणारा आजचा पुरस्कार समारंभ अभिमानास्पद आहे. अध्यक्षीय भाषणात रवींद्र बेडकिहाळ यांनी, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या स्थापनेची व बाळशास्त्रींच्या स्मारक कार्याची माहिती दिली. शीतल करदेकर यांनी पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मोहिते यांनी, पुरस्कार सर्व पत्रकारांना स्फूर्तिदायी ठरेल, असे सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply