कामगारांना सुट्टी देऊन केला अनोखा सन्मान
नवी मुंबई ः बातमीदार
‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ ही ओळ केवळ घोषवाक्यापुरती मर्यादित न ठेवता रविवारी (दि. 15) बेलापूर विभाग कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत तेथील स्वच्छताकर्मींच्या दैनंदिन कामाचा सन्मान करण्यासाठी त्यांना सुट्टी दिली आणि स्वत: झाडूसह इतर स्वच्छता साधने हातात घेत रस्ते, गल्ल्या साफसफाई केली आणि स्वच्छतेचा नवा आदर्श स्वकृतीतून प्रदर्शित केला. सकाळी 6.30 वाजल्यापासून बेलापूर विभागात ठिकठिकाणी नागरिक आपापल्या परिसरातील सफाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि 2800हून अधिक नागरिकांच्या सहभागने जणू बेलापूर विभागात स्वच्छतेची व्यापक चळवळच उभी राहिली. यामध्ये तरूणाईची संख्या लक्षवेधी होती. याचवेळी बेलापूर विभागातील स्वच्छताकर्मींसाठी बेलापूर विभाग कार्यालयाच्या बेलापूर भवन इमारतीत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील क्रोमा समोरील मैदानात 325हून अधिक स्वच्छताकर्मींनी एकत्र येत सेक्टर 11 येथील बेलापूर भवन पर्यंत स्वच्छता रॅली काढली आणि स्वच्छतेविषयीचा प्रचार केला. कचरा वर्गीकरणाचे महत्त्व, प्लास्टिक प्रतिबंधाची गरज, ओल्या कच-याची कंपोस्ट बास्केट वापरून घरच्या घरी अथवा सोसायटीच्या आवारात कम्पोस्ट पीट्सव्दारे विल्हेवाट अशा स्वच्छताविषयक अनेक महत्वाच्या गोष्टींविषयी फलक उंचावत तसेच मोठ्याने घोषणा देत या स्वच्छताकर्मींना परिसर दणाणून सोडला.
*फोटो नवी मुंबई स्वच्छता
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …