आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल ः वार्ताहर
पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रविवारी (दि. 15) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेल सेक्टर 5 येथील वृंदावनबाबा समाधी मंदिर सभागृहात या उपक्रमांचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर सुरक्षा सप्ताह रॅलीला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी, मृत्यू व जखमींचे होण्याच्या घटना घडू नयेत यासाठी सरकारच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान आयोजित केले जाते. कोरोना वैश्विक संकटानंतर यंदा मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि प्रबोधन करणारे हे अभियान सुरू झाले आहे. पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने सालाबादप्रमाणे यंदाही यासाठी पुढाकार घेतला. या अंतर्गत नवीन पनवेल येथील वृंदावनबाबा समाधी मंदिर सभागृहात रविवारी कच्छ युवक संघाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्कूल व्हॅन चालक तसेच नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे विद्यार्थी वाहकांची नेत्रतपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. नायर सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल व नवदृष्टी सेवा संस्थेच्या मदतीने हे शिबिर घेण्यात आले. या वेळी डॉ. मालविका मिरज यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. उपक्रमाला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे, पालक प्रतिनिधी विजया कदम, अॅड संदीप वाघ यांच्यासह वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तत्पूर्वी, नवीन पनवेल येथे रस्ता सुरक्षितता जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पनवेल विद्यार्थी वाहक संस्था स्वयंशिस्त पाळणारी संघटना आहे. राज्याला आदर्श घालून देणारे काम या संस्थेकडून केले जात असल्याचे गौरवोद्गार काढले. कोरोनामध्ये अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. यामध्ये स्कूल व्हॅनचालकांचाही समावेश होता. आता शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून परवाने व इतर प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी शंभर टक्के प्रयत्न करेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी या निमित्ताने दिली. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.