Breaking News

राज्यात अनेक निर्बंध शिथिल; हॉटेल्स, मॉल्स मात्र बंदच

मुंबई : प्रतिनिधी

केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली असून येत्या 30 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे, मात्र लॉकडाऊन सुरू करतानाच राज्य सरकारने ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत तीन टप्प्यांत निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता नागरिकांना जॉगिंग, व्यायाम, सायकलिंग करता येणार असून गार्डनमध्येही फिरता येणार आहे. तसेच इलेक्ट्रिशियन्स, गॅरेज आणि पेस्ट कंट्रोल आदी गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कंटेन्मेंट झोन वगळता सरकारी कार्यालयेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने काही ठिकाणी मार्केट्स सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी हॉटेल्स, मॉल्स सुरू करण्यास मात्र सरकारने परवानगी दिली नाही. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रविवारी (दि. 31) ही अधिसूचना जारी केली.

अधिसूचनेनुसार राज्य सरकारने 3 जून, 5 जून व 8 जूनपासून काही गोष्टींना सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे. 3 जूनपासून उद्यानात जाण्यास परवानगी देण्यात आली. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली, मात्र या ठिकाणी कोणतीही ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी करण्यास मनाई आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच या सुविधेचा लाभ घेता येईल. नागरिकांना जवळपास प्रवासाची परवानगी देण्यात आली, मात्र लांब प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.खुल्या मैदानात गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

3 जूनपासून प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेस्ट कंट्रोल व इतर टेक्निशियनच्या कामास परवानगी देण्यात आली, मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व मास्क लावणे बंधनकारक केले आहे. तसेच कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील आरोग्य, वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचार्‍यांसह सर्व सरकारी कर्मचार्‍यांची कार्यालयांमध्ये किमान 15 टक्के हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.

5 जूनपासून सर्व मार्केट्स आणि दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील, मात्र मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. दुकाने सुरू केल्यानंतर दुकानात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची जबाबदारी दुकानदारांवर ठेवण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केलेले आढळल्यास तत्काळ दुकान बंद केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. 8 जूनपासून राज्य सरकारने काही प्रमाणात खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. खासगी कार्यालयात केवळ 10 टक्के उपस्थिती असावी. इतर कर्मचार्‍यांनी वर्क फ्रॉम होम करावे, तसेच कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील जिल्ह्यात बससेवा सुरू राहणार आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply