Breaking News

‘शिवसंग्राम’ भाजपसोबतच निवडणुका लढवणार; प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांचे प्रतिपादन

महाड ः प्रतिनिधी

2014पासून शिवसंग्राम संघटना भाजपबरोबर काम करीत आहे. येणार्‍या काळातही सर्व निवडणुका ‘शिवसंग्राम’चा भारतीय संग्राम परिषद हा पक्ष भाजपसोबतच राहून लढवेल, असे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सोमवारी (दि. 16) येथे जाहीर केले. शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा कोकण दौरा सुरू असून या निमित्ताने महाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसंग्रामची भूमिका स्पष्ट करण्यात आली. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसंग्राम पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली असून महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आणि राज्य पातळीवर मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी शिवसंग्राम संघटना ही भाजपसोबत काम करत असून राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने विनायकराव मेटे यांनी प्रथम लढा उभा केला होता, मात्र मराठा आरक्षण मिळू नये म्हणून काही नतद्रष्टांनी जाणीवपूर्वक अडथळे आणल्याचा आरोप केला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतरराष्ट्रीय पातळीवरील स्मारक मुंबई येथील अरबी समुद्रात उभे राहण्यासाठी मेटे यांनी विशेष मेहनत घेतली होती. हे काम लवकरच सुरू होऊन पूर्णत्वास जावे, असे ते म्हणाले. शिवसंग्राम संघटना सात मुद्दे घेऊन राज्यात संघटनात्मक बांधणीसाठी दौरा करत असून या सात मुद्यांपैकी मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक यासह अन्य मुद्दे आहेत. पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यासह, सरचिटणीस विक्रांत आंब्रे, मुंबई अध्यक्ष दिलीप माने, संस्कृतिक विभाग प्रमुख दीपक कदम, प्रदेश सचिव हिंदुराव जाधव, मुंबई जिल्हा अध्यक्ष योगेश विचारे, श्री. मालुसरे, रायगड जिल्हा सरचिटणीस अनंत देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित  होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply