Breaking News

बाल्कनी साडेपाच का बीस बोलो…; ‘शोले’चा हादेखील विक्रम

गब्बर -छोड दे हरामजादे,
मुझे छोड दे.
ठाकूर -गब्बर यह हाथ नही
फांसी का फंधा है.
गब्बर -याद रखूंगा तुजे याद रखूंगा
जेल कि दिवार इतनी कच्छी
नही कोई गब्बर को रोख ले.
ठाकूर -बीस साल मे सब
कुछ भुल जाओगे गब्बर.
गब्बर -मुझसे दुश्मनी बहुत
महंगी पडेगी ठाकूर.
ठाकूर -कुत्ते कमीने हरामजादे.
गब्बर -दे दे और जोर जोर से गाली दे. ए कालिया! उस दिन कचैरी मे इतना ताप चाहता तो वही इसका तैटवा दबा देता. लेकिन हाथो मे
हथकडी, पैरो मे बेडी याद है.
गब्बर -बहुत जान है तेरे इस हाथों मे  ठाकूर. क्या कहा था तुमने! यह हाथ नही फांसी का फंधा है. देख फंधा खूल गया. यह हाथ मुझे दे दे ठाकूर.
ठाकूर -नही नही.
गब्बर -यह हाथ मुझे दे दे
ठाकूर दे दे ईआ ईआ हा.
प्रत्येक डायलॉगला हाऊसफुल्ल गर्दीतून टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार रिस्पॉन्स…
आपल्या देशात मसालेदार मनोरंजक चित्रपट पाहणे म्हणजे एक प्रकारचे सेलिब्रेशन.. शोले त्याचे उत्तम उदाहरण. त्याच्या अनेक गोष्टी त्या काळात गाजल्या आणि आजही म्हणजेच पन्नास वर्षांनंतरही त्या गोष्टींवर फोकस टाकला जातोय.
एक पाच जणांचे कुटुंब (पती, पत्नी आणि तीन मुले… सत्तरच्या दशकातील ही गोष्ट आहे हो) व्यवस्थित नटूनथटून आपल्या फियाट गाडीने मिनर्व्हा थिएटरवर रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ हा मल्टी स्टार कास्ट सत्तर एमएम व स्टीरीओफोनिक साऊंड सिस्टीमचा धमाकेदार चित्रपट पाह्यला येतात. थिएटरच्या कार पार्किंगमध्ये गाडी नेत असतानाच हाऊसफुल्ल गर्दीतून वाट काढत असतानाच ’तिकीट खिडकीवर’ आपल्याला तिकीटे मिळणार नाहीत असे त्यांनी घरुन निघाल्यापासूनच गृहीत धरलंय असे कुटुंब प्रमुखाच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतेय. त्यात काय विशेष अशा आविर्भावात गाडी पार्क करून कुटुंबप्रमुख थेट त्याच गर्दीत एका बाजूस उभ्या उभ्याच बोलत असलेल्या, जल्दी बोलो, स्टॉल का पंधरा रुपया, बाल्कनी साडेपाच का बीस रुपया…. हा कुटुंबप्रमुख सहजपणे शंभर रुपयात पाच तिकीटे घेतो आणि आपली तिकीटे कन्फर्म झालीत असे मानतच निर्धास्त होतो….
पिक्चरच्या तिकीटांचा असा काळाबाजार ही एकेकाळची हुकमी बहुस्तरीय संस्कृती. ब्लॅकवाल्यांनी तिकीट खिडकीवरुन बरीच तिकीटे घेतली आणि चढ्या भावात ती विकली अशी ही सरळ रेषेत जाणारी वाट अथवा गोष्ट नाहीच. त्याबाबतही अनेक लहान लहान गोष्टी, कथा, दंतकथा, किस्से वगैरे आहेतच. याला तुम्ही ’टॉकीजची गोष्ट’ म्हणा अथवा पब्लिक संस्कृतीचा फंडा म्हणा, हा एक भन्नाट असा रिअ‍ॅलिटी शो नक्कीच आहे.  
ही संस्कृती पन्नासच्या दशकापासूनच सुरू आहे असे म्हटले जाते आणि त्यात निश्चित तथ्य असावे. शोधक वृत्तीचा दिग्दर्शक विजय आनंदला ’काला बाजार’ ( प्रदर्शन 9 सप्टेंबर 1960)ची कल्पना याच कल्चरवरुन सुचली. एकेकाळी तो धोबीतलावच्या मेट्रो थिएटरमध्ये हिंदी अथवा इंग्लिश चित्रपट पाह्यला येई तेव्हा त्याला थिएटरपासून थोडेसे दूरवर मेट्रोच्या तिकीटांचा काळाबाजार चालताना दिसे. ते पाहून त्याचे कुतूहल वाढले. अधिक शोध घेताना त्याला काही रंजक माहिती मिळाली. तो म्हणे, एखाद्या निर्मात्याकडून ’सुपारी’ घेऊन दुसर्‍याचा पिक्चर सुरु असतानाच थिएटरमध्ये हुडआउट करायचे. याचा इतर पब्लिकवर दुष्परिणाम व्हायला हवा. त्याचे असे काही उपद्व्याप करणारे रॅकेट होते… गोल्डी आनंदने या गोष्टी आवश्यक त्या प्रमाणात ’काला बाजार’ पिक्चरमध्ये वापरल्या. देव आनंद त्यात गुन्हेगार नायक होता.
राज कपूर अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ’मेरा नाम जोकर’ ( 1970) हा त्याचा विलक्षण महत्त्वाकांक्षी चित्रपट पडला की पाडला हा विषय या चित्रपटाला बावन्न वर्षे झाली तरी चर्चेत असतो, त्यात एक ’रिळ’ हे या ब्लॅक मार्केटवाल्यांनी जोकरची तिकीटे मुद्दाम स्वस्तात विकली आणि या पिक्चरमध्ये फारसा दम नाही असे नकारात्मक वातावरण निर्माण केले असे अगदी ठामपणे म्हटले जाते. ब्लॅक मार्केटमधील ’जोकरचे पतन’ राज कपूरच्या व्यावसायिक शत्रूचे ’फिक्सिंग’ अथवा सेटिंग होते असे तेव्हापासून आजतागायत कायमच रंगवून रंगवून सांगितले जाते.
ब्लॅक मार्केटमधील पिक्चर्सची तिकीटे हा असा बहुरंगी विषय आहे.  याला हस्तकौशल्य म्हणायचे की शब्द चातुर्य हा मात्र प्रश्न आहे. काही असो, ब्लॅक मार्केटमध्ये चित्रपटाची तिकीटे बोलता बोलता विकणे एक कलाच. अनेकदा तरी तोंडी तिकीटाचा चढता भाव असलेल्याच्या हातात तिकीटे नसत. आपण तिकीट हवे म्हटले की तो आडेवाटेला पाठवे. आमच्या गिरगावातील सेन्ट्रल थिएटर असेल तर ब्लॅकवाले गोरेगावकर लेनमध्ये उभे असत, नॉव्हेल्टी थिएटरमध्ये ते अनेकदा तरी कार पार्किंगमध्ये असत. अनेकदा तर अगदी थिएटरबाहेर उभे राहून भराभर तिकीटे विकत. शालिमार, रॉक्सी, अलंकार, ड्रीमलॅन्ड थिएटरबाहेर हे सर्रास दिसे. आम्हा मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्यांना उगाच भाबडा प्रश्न पडे, अशा सहजपणे ब्लॅकमध्ये तिकीटे विकली जाताहेत म्हणजे काय? कायदा आहे कुठे वगैरे प्रश्न पडत आणि त्यातूनच काही दंतकथा जन्माला येत. अधूनमधून पोलिसांची धाड पडल्याच्या बातम्या असत. गंमत म्हणजे, सुपर हिट पिक्चरची तिकीटे ब्लॅकमध्येही मिळत नाहीत असा अनुभव आला की अनेक जण निराशही होत आणि आजच रेड कशाला पडली असा हुरहूर वाटणारा प्रश्न त्याना पडे. कधी म्हटले जाई की, पोलीस बायकांना त्रास देऊ शकत नाहीत म्हणून काही ब्लॅकवाले आपल्या सहा सात जणांच्या गॅन्गमध्ये एक दोन महिला ठेवत. अर्थात, यात रिअ‍ॅलिटी किती व कोणती हे ब्लॅक मार्केटची जमातच सांगू शकली असती, पण प्रत्येक थिएटरवरचे ब्लॅकवाले हुकमी असत. ते आपला इलाका सांभाळत. इतरांच्या थिएटरमध्ये ते घुसखोरी करीत नसत. याला व्यावसायिक शिस्त अथवा एक प्रकारचा प्रामाणिकपणा म्हणायला हवा. या जमातीची संघटना अथवा सिंडिकेट नसावी; अन्यथा पब्लिकला हमखास आवडतील आणि अनेक आठवडे हाऊसफुल्ल गर्दीत चालतील असेच चित्रपट काढावेत अशीच मागणी त्यांनी केली असती.
ब्लॅकवाल्यांच्या खासियत अनेक… सत्तरच्या दशकात शुक्रवारी रिलीज होत असलेल्या नवीन चित्रपटाची आगाऊ तिकीट विक्रीची खिडकी सोमवारी उघडताना अगदी सकाळपासूनच लागलेल्या रांगेत यांची मंडळी खूपच असत. पिक्चरची जेवढी हवा जास्त तेवढ्या जोरात पहिला अख्खा आठवडा तो पिक्चर हमखास हाऊसफुल्ल होणारच अशी हमी असे. त्यात पहिले तीन दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार व रविवार तिकीटाला जबरा मागणी असणार याची हमी. त्यातही ’दाग’, ’प्रेम नगर’, अमर अकबर अ‍ॅन्थनी, ’मुक्कदर का सिकंदर’, ’मिस्टर नटवरलाल’, ’हम किसीसे कम नही’, ’कुर्बानी’ या पिक्चरचा फर्स्ट डे फर्स्ट शो पब्लिक रिपोर्ट सकारात्मक अथवा गरम आलाच तर शुक्रवारीच ब्लॅक मार्केटमध्ये सेकंड शोपासूनच चढा दर. पैसे कमवाईची उत्तम संधी आणि जेव्हा एक महल हो सपनो का, ’शालिमार’, ’रजपूत’, ’कुदरत’, ’लुटमार’, ‘तिसरी आँख’ या पिक्चर्सचे पब्लिक रिपोर्ट ’नरम’ आले तेव्हा ब्लॅक मार्केटमध्येही रेट आपोआप उतरले अथवा पडले, पण अधिक नुकसान होऊ नये म्हणून मूळ भावात तिकीटे विकायची तयारी असे. काही पिक्चर्स असे आपटत की याच ब्लॅकवाल्यांना आपल्या हातात राहिलेली तिकीटे चक्क फाडून टाकावी लागत. एफ.सी. मेहरा निर्मित व शम्मी कपूर दिग्दर्शित ’मनोरंजन’ (1974) पिक्चरचा पब्लिक रिपोर्ट अतिशय निराशाजनक आल्याने काही ब्लॅकवाल्यांनी लास्ट शोला म्हणजेच रात्री  नऊच्या शोला अतिशय रागाने खिशात ब्लेड नेऊन मिनर्व्हा थिएटरमधील काही सीटस फाटल्याची बातमी त्या काळात गाजली होती. याच मिनर्व्हाबाहेर ’शोले’च्या तिकीटाची अनेक आठवडे ब्लॅक मार्केटमध्ये विकून काहीनी आपल्या गावी बंगला बांधला, कोणी हॉटेल काढले.
काही ब्लॅकवाले पिक्चर ज्युबिली हिटचीही आपली एक पार्टी करत, कारण पिक्चरच्या यशाचा त्यांनाही फायदा झालेला असतो आणि तेही यशाचे वाटेकरी. खरंतर ही ’टॉकीजच्या गोष्टी’ला समांतर अशीच एक प्रकारची रोखठोक ’खुली’ अर्थव्यवस्था. थिएटरचा चालक, पिक्चरचा वितरक प्रत्येक तिकीटावरचा मनोरंजन कर, आणखी काही कर भरतोय आणि त्यात जाऊन जे पैसे राहतात. ती त्याची कमाई. (आज पिक्चर लागतोय तोच कोट्यावधीच्या कमाईचे आकडे येतात त्यातील करात किती जातात विचारा.) ब्लॅक मार्केटवाल्याला जणू एक प्रकारची करमाफी. पण त्यात धोके जास्त. पकडले जाऊ नये म्हणून फिल्डींग आणि हाती सापडलो तरी वांधे. दुसर्‍या बाजूने पाहिले तर यांचे चढे दर म्हणजे, पिक्चर सॉलीड हिट असल्याचा जणू हिरवा कंदील. आणि ’पिक्चर पाह्यला आलोय, हाऊसफुल्ल असला तरी ब्लॅकमध्ये तिकीट घेईन पण पिक्चर पाहूनच घरी जाईन’ असा निर्धार असलेल्या वर्गाची जणू ही चालती/फिरती/बोलती तिकीट खिडकी’. एक प्रकारे पिक्चरचे तिकीट मिळण्याचे हुकमी ठिकाण. तरी रवि टंडन दिग्दर्शित ’अपने रंग हजार’ (संजीवकुमार व लीना चंदावरकर) याच्या तिकीटावरून अप्सरा थिएटरचा बुकिंग क्लर्क आणि ब्लॅक मार्केटवाला यांचा वाद बाचाबाचीने असा काही विकापोला गेला की तो बुकिंग क्लर्क भांडत भांडत थिएटर्सबाहेर येताच त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याची वृत्तपत्रात बातमी आली होती.
फार पूर्वी म्हणे यात सिंडिकेट होते. आमच्या दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सची तिकीटे भुलेश्वर भागात कुठे तरी चढ्या भावात मिळत. खरे काय नि खोटे काय याची कल्पना नाही. मी स्वतः कधी याचा अनुभव घेतला नाही. मी कायमच पडद्यासमोरच्या पहिल्याच दोन चार रांगेतील स्टॉलचा हुकमी रसिक. कुठे एक रुपया पासष्ट पैसे, तर एअर कंडिशन थिएटर्सला हेच तिकीट दोन रुपये वीस पैसे आणि खिशात तेवढेच पैसे. ब्लॅकमध्ये तिकीट घेण्याचा विचारच करु शकत नव्हतो. फक्त कान टवकारून आकडा ऐकायचो अथवा नाझला तिकीट मिळाले नाही तर अगदीच शेजारच्या स्वस्तिक अथवा इंपिरियलला जायचो.
ब्लॅक तिकीटवाले आणि फिल्मवाले यांचा काही अनोखा रिश्ता वगैरे??. हो अथवा नाही असे नेमके उत्तर नाही. एक वेगळाच किस्सा सांगतो, चित्रपती व्ही. शांताराम यांनी आपल्या ’शांतारामा’ या आत्मचरित्रात एक अनुभव सांगितला आहे. आपल्या नवीन चित्रपटाला पब्लिक रिस्पॉन्स कसा आहे हे अनुभवण्यास गेले असता आपल्या चित्रपटाची तिकीटे ब्लॅकमध्ये चक्क स्वस्तात विकली जाताहेत हे दिसले. या गोष्टीचा त्यांनी ताबडतोब छडा लावण्यात यश मिळवले. हे सगळे वाचून मीही अचंबित झालो.
असो. ब्लॅक मार्केटमधील तिकीटे हा चित्रपटसृष्टीच्या एकूणच सिस्टीम आणि संस्कृतीचा एक भाग आहे. अनेक मराठी चित्रपटांच्याही बाबतीत हे घडलयं. (त्यांच्याही नशिबी हे सुख आले असेही कौतुकाने म्हणता येईल.) दादा कोंडके यांचा मनोरंजक चित्रपट म्हणजे ब्लॅक मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण. ’सोंगाड्या’पासूनच ही परंपरा सुरू झाली आणि मग दादा कोंडके यांचा पिक्चर म्हणजे, नेहमीच गर्दीची भरती. एकदा का डोक्यात आले की आज दादांचा पिक्चर पाहून मस्त एन्जॉय करायचे की ब्लॅक मार्केटमध्येही तिकीट काढून हौस मौज पूर्ण करण्याची अनेकांची मानसिक व आर्थिक तयारी असे. मुंबई, पुणे, कोल्हापूर तर झालेच, पण तालुक्याच्या ठिकाणीही हे लोण पोहचले होते. किरण शांताराम निर्मित व सचिन देव दिग्दर्शित ’अशी ही बनवाबनवी’, विजय कोंडके निर्मित व दिग्दर्शित ’माहेरची साडी’ हे पिक्चर आपण ब्लॅकमध्ये तिकीट घेऊन पुन्हा पुन्हा एन्जॉय केले असे सांगणाराही एक हुकमी ऑडियन्स होता. असा हा रिपिट ऑडियन्स ब्लॅक मार्केटला जणू सपोर्ट सिस्टीम ठरणारा. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांचे माझ्यासारखे फॅन्स त्यांचा पिक्चर एकदा पाहून समाधानी होत नसू.
‘शोले’चे पन्नासावे वर्ष गाजत असतानाच त्याच्या अनेक वैशिष्ट्यांसह त्यांच्या तिकीटांच्या काळाबाजाराचीही दखल हवीच. विशेष उल्लेखनीय गोष्ट शोलेच्या तिकीटांच्या काळाबाजार करणार्‍यांनी आपल्या गावात बंगला बांधला असे म्हणतात. असेलही कदाचित, कारण शोले अनेकांना भारी पावला, तसाच तो ब्लॅक मार्केटवाल्यांनाही पावला असेल. तोदेखील त्या काळात मिनर्व्हा चित्रपटगृहात चक्क तीन वर्ष नियमित दिवसा तीन खेळ या प्रमाणात आणि मग मॅटीनी शोला शिफ्ट केल्यावर आणखी दोन वर्ष. असा एकूण पाच वर्ष शोलेच्या तिकीटांची काळाबाजारात विक्री होत होती हादेखील भन्नाट विक्रम.
-दिलीप ठाकूर (चित्रपट समिक्षक)

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply