पेण ः प्रतिनिधी
थकबाकी वसुली व वीजचोरांविरूद्ध मोहीम राबवण्यासोबत सर्वोत्तम ग्राहकसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. पेण, अलिबाग आणि पनवेल ग्रामीण येथे उपविभागीय अभियंता ते शाखा अभियंत्यांपर्यंतच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
या वेळी पेण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे उपस्थित होते. वाढती वीजहानी व थकबाकी, वसुलीचे निर्धारित लक्ष्य पूर्ण न होणे, रोह़ि़त्र नादुरूस्त होण्याचे अधिक प्रमाण यासंदर्भात प्रादेशिक संचालक नाळे यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष प्रयत्न करून वसुलीचा वेग वाढवून निर्धारित लक्ष्य पूर्ण करावे व वाढत्या थकबाकीला आळा घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. रोहित्राची दुरूस्ती तातडीने करून नादुरूस्त रोहित्र तत्काळ बदलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या, तर सुटीच्या दिवशीही ग्राहकांना वीजबिल भरणे सोयीचे व्हावे यासाठी भरणा केंद्र सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.