सर्वेश कोळी आत्महत्या प्रकरण : बेलपाडा ग्रामस्थांची मागणी
उरण : प्रतिनिधी
बेलपाडा गावातील सर्वेश कोळी याच्यावर मोबाईल फोडल्याचा आरोप झाल्याने त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेतील योगेश कोळी यांना अटक झाली. मात्र राजश्री कोळी यांना अटक झालेली नाही. त्यामुळे कोळी कुटुंबीयांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. राजश्री कोळी यांनाही अटक करण्याची सर्वेश कोळी यांच्या कुटुंबियांची व ग्रामस्थांची मागणी असल्यामुळे दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी बेलपाडा गावातील तरुण एकत्र आले असून सर्वेश कोळीला न्याय मिळवून देण्याचा निर्धार गावातील तरुणांनी केला आहे. बेलपाडा गावातील तरुण वर्ग, सर्वेशचे चाहते, मित्र वर्ग, सामाजिक कार्यकर्ते न्हावा शेवा पोलीस स्टेशन येथे एकत्र आले होते. यावेळी सर्वेशला न्याय मिळवून देण्याची चर्चा झाली. सर्वेश कोळीला न्याय मिळवून द्यायचा असा निर्धार उपस्थित सर्व तरुण वर्गांनी, ग्रामस्थांनी केला. त्या अनुषंगाने राजेश्री कोळी यांना अटक करण्यात यावी यासाठी न्हावा शेवा पोलीस स्टेशन येथे सर्व ग्रामस्थ एकत्र आले. ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन राजश्री कोळी हिला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उरण तालुक्यातील जासई बेलपाडा गावात राहणार्या राजश्री कोळी व योगेश कोळी या दाम्पत्याने गावातील सर्वेश कोळी याच्यावर 40 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन फोडल्याचा आळ घेतल्याने सर्वेशने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर न्हावा शेवा पोलिसांनी सर्वेशच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या राजश्री कोळी व योगेश कोळी या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून योगेश कोळी याला अटक केली आहे. मात्र राजश्री कोळी यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. एकाच वेळी पती पत्नी असलेल्या योगेश कोळी व राजश्री कोळी यांच्यावर गुन्हा दाखल झाले असताना फक्त योगेश कोळी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र राजश्री कोळी यांना अटक झालेली नाही. त्यामुळे सर्वेश कोळी याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या राजश्री कोळी हिला सुद्धा अटक व्हावी. या दोघांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वेशच्या कुटुंबियांनी, उपस्थित तरुण वर्ग, मित्र परिवार, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली असून या सर्वांनी न्हावा शेवा पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत निवेदन दिले आहे.