आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : वार्ताहर
कळंबोली वसाहतीत पनवेल महापालिकेच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत अध्यादेशसुद्धा काढण्यात आला आहे.
कळंबोली सेक्टर 11 येथे उभारण्यात येणार्या या वास्तूचा संकल्पीय आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसुद्धा मिळाली आहे. ही पथदर्शी वास्तू असावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. विशेष म्हणजे याकरिता पाच कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत. महापालिका मूलभूत सोयीसुविधा विकास विशेष तरतूद या योजनेंतर्गत हा निधी उपलब्ध होणार आहे. माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने ही वाटचाल आहे.
धनगर समाजातील मोठ्या संख्येने कुटुंब नोकरी-व्यवसायानिमित्त कळंबोलीत स्थायिक झाले आहेत. लोकवस्तीचा विचार करता त्यांना विविध धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक तसेच वैयक्तिक कार्यक्रम करायचे असल्यास त्यांच्याकडे जागेचा अभाव आहे. खासगी हॉलमध्ये कार्यक्रम करणे खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे येथील सर्वसामान्य लोकांसाठी एक हक्काचे सभागृह असावे अशा प्रकारची मागणी होत होती. राजमाता अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या श्रद्धास्थान आहेत. त्यांनी देशभरात अनेक मंदिरे उभारली, गोरगरिबांसाठी पुण्याचे काम केले. म्हणून त्यांना पुण्यश्लोक असे संबोधले जाते. उत्तम प्रशासकाबरोबर महिलांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवींची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करायची असेल तर पनवेल परिसरात भाडेतत्वावर जागा घ्यावी लागते. या सर्व गोष्टी पाहता त्यांच्या नावाने बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात यावे, अशी मागणी माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी केली होती. त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता.
मोनिका महानवर यांच्या मागणीची दखल घेत कळंबोलीत सेक्टर 11 येथील 6सी/1 या सामाजिक आरक्षित भूखंडावर राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सिडकोकडून हा भूखंड घेण्यात आला असून त्यासाठी एक कोटी 19 लाख नऊ हजार 682 रुपये प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. त्याचा संकल्प आराखडा आणि नकाशे तयार करण्यात आले असून महासभेची मंजुरी मिळाली आहे.
या सभागृहाकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली असली तरी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्यासमवेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महाराष्ट्रासाठी परदर्शी ठरवा अशी वास्तू उभी करण्यासाठी राज्य सरकारकडून पनवेल महापालिकेला निधी मंजूर करावा ही महत्त्वपूर्ण मागणी या वेळी करण्यात आली. पनवेल महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. यासाठी लागणारा वाढीव निधी राज्य सरकार नक्कीच देईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी होती. या आश्वासनाची सरकारने पूर्तता केली आहे.
असा आहे संकल्पीय आराखडा
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाची जी प्लस टू इमारत बांधण्यात येणार आहे. प्रस्तावित वास्तूमध्ये तळमजल्यावर पार्किंग, पहिल्या माळ्यावर 37 बाय 71 चौरस फुटाचा बहुउद्देशीय हॉल असणार आहे. कार्यालय आणि स्वच्छतागृहाची सोय येथे असणार आहे. दुसर्या माळ्यावर दोन हजार चौरस फुटाची अभ्यासिका आणि 1771 चौरस फूट क्षेत्रफळावर वाचनालय बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ 18565.52 चौरस फूट इतके असणार आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पनवेल महापालिकेतर्फे कळंबोलीत उभ्या राहणार्या प्रस्ताविक सभागृहासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीसाठी पाठपुरावा केला होता. सरकारकडून या वास्तूसाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबद्दल राज्य सरकार, उपमुख्यमंत्री आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आम्ही सर्वजण आभारी आहोत.
-मोनिका महानवर, माजी सभापती, महिला व बालकल्याण समिती, पनवेल मनपा