Breaking News

अत्याधुनिक क्षेपणास्त्र निर्यातीसाठी भारत सुसज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारत लवकरच क्षेपणास्त्रांची पहिली बॅच निर्यात करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारपासून (दि.14) सिंगापूरमध्ये तीन दिवसीय ‘आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शना’ची सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनादरम्यान बोलताना भारताने तयार केलेल्या क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचची निर्यात करण्यास तयार असून, यासाठी सरकारची आवश्यक मंजुरी मिळणे बाकी असल्याची माहिती ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’चे मुख्य महाप्रबंधक कमोडोर एस. के. अय्यर यांनी दिली. या प्रदर्शनात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस कोलकाता’ आणि ‘आयएनएस शक्ती’ या युद्धनौकाही सहभागी झाल्या आहेत.

अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार्‍या ब्रह्मोस, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांसारख्या कंपन्यांनीही आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दरम्यान, दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांनी भारतीय क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवला आहे. ही भारताची पहिलीच निर्यात असून, भारताने निर्माण केलेल्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी दक्षिण पूर्व आशियाई आणि आखाती देश इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी दक्षिण पूर्व आशियाई आणि आखाती देशांना करण्यात येणारी क्षेपणास्त्रांची निर्यात ही मोठी संधी मानली जात आहे. आशियाई आंतरराष्ट्रीय समुद्री संरक्षण प्रदर्शनामध्ये जगभरातील 236पेक्षा अधिक संरक्षण क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाल्या आहेत. भारतीय संरक्षण उद्योगाच्या सहकार्याने निर्यात संधी उपलब्ध असल्याचे मत ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या संरक्षण व सुरक्षा संघटनेतील नौदलाचे वरिष्ठ सल्लागार कॅप्टन निक मॅकडोनाल्ड रॉबिन्सन यांनी मांडले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply