Breaking News

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार!

कोकण शिक्षक मतदारसंघात महायुतीची एकजूट

अलिबाग : प्रतिनिधी
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीने एकजुटीने आपली ताकद लावली असून महाविकास आघाडीविरोधात आव्हान उभे केले आहे.
राज्य विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. ज्या शाळांना माध्यमिक शाळेचा दर्जा देण्यात आला आहे, अशा शाळांमधील मागील सहा वर्षांत किमान तीन वर्ष शिक्षक म्हणून काम केलेले शिक्षक या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असतात.
या मतदारसंघात एकूण 37 हजार शिक्षक मतदार आहेत. यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 14 हजार 995, रायगडमधील 10 हजार 87, पालघरमधील सहा हजार 718, रत्नागिरीमधील चार हजार 69 आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोन हजार 164 मतदार आहेत. मतदारांची संख्या जास्त असल्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारांचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघावर गेली अनेक वर्षे भाजपचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शेकाप उमेदवार पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून गेला होता, मात्र राज्यात सत्तांतर झाल्यामुळे समीकरण बदलले आहे. हा मतदारसंघ पुन्हा मिळविण्यासाठी भाजपने जोर लावला असून अभ्यासू, मेहनती व दांडगा जनसंपर्क असलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार म्हात्रे स्वतः शिक्षक असून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी खचून न जाता सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांत मतदारसंघाची नव्याने बांधणी केली. त्यातच शिक्षक परिषदेच्या वेणूनाथ कडू यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार म्हात्रे यांच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांच्यासाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. शेकापवर बोगस मतदार नोंदणीचाही आरोप होत असून काही शाळांना शासकीय अधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत.
विशेष म्हणजे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिक्षक परिषद व मित्रपक्षांच्या नेत्यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी एकजुटीने सभा, बैठका घेतल्या आणि त्यांना निवडून देण्याचे आवाहन शिक्षकवर्गाला केले. महाविकास आघाडीचा प्रचार मात्र त्या तुलनेत दिसला नाही. या निवडणुकीसाठी 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत मतदान होणार आहे, तर मतमोजणी 2 फेब्रुवारीला नेरूळ सेक्टर 24 येथील आगरी कोळी संस्कृती भवन या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply