मनपाच्या इमारतीचे काम करताना कामगारांचे जीव टांगणीवर
नवी मुंबई : प्रतिनिधी
एकीकडे नवी मुंबई परिसरात चाललेल्या खाजगी इमारतीच्या बांधकामांवर काम करताना बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य वापरत आहेत, परंतु या उलट मनपाच्या इमारतीचे काम करत असताना मात्र बांधकाम मजूर सुरक्षात्मक साहित्य न घेता काम करत असल्याने भरउन्हात जर एखाद्या कामगाराला भोवळ आली किंवा तोल गेला, तर त्याच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणेत कायम बसणार्या कार्यकारी अभियंत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
सर्वसाधारणपणे इमारतीवर काम चालू असताना काम करताना कामगारांना सुरक्षेचे साहित्य पुरविणे त्या कंत्राटदाराचे काम आहे, परंतु मनपाच्याच इमारतीचे काम चालू असताना संबंधित मनपा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने खाजगी इमारत विकसकांनी कोणता आदर्श घ्यावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या कोपरखैरणे व वाशी येथील इमारतीचे काम अनुक्रमे तीन व पाच माळ्यावर चालू आहे. याबाबत कार्यकारी अभियंता आरविंद शिंदे यांना विचारले असता त्यांनी, तत्काळ कार्यवाही करण्यास सांगतो, असे सांगितले.