नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम
नवी मुंबई : बातमीदार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. या वेळी माजी खासदार संजीव नाईक, शहर अभियंता संजय देसाई, परिमंडळ 1 विभागाचे नमुंमपा उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, उपायुक्त अनंत जाधव, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट, कार्यकारी अभियंता अजय संख्ये आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने ’जय जय महाराष्ट्र माझा’ हे कविवर्य राजा बढे लिखित गीत महाराष्ट्राचे ’राज्यगीत’ म्हणून अंगीकृत केले आहे. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदायाच्या वतीने राज्यगीताचे समूहगान करण्यात आले. अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त अनंत जाधव, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट, कार्यकारी अभियंता अजय संख्ये व सुनील लाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रसायनीत शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
मोहोपाडा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 वी जयंती मोहोपाडा रसायनी परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त्ताने आळी आंबिवलीतून मोहोपाडा, नवीन पोसरी अशी भव्यदिव्य मिरवणूक नाशिक ढोळ ताशांच्या तालावर घोडे, उंटावर स्वार झालेले मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक साकारलेला देखावा अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुक मोहोपाडा शिवाजी चौकात आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून शिवघोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यानंतर नविन पोसरी हनुमान मंदिराच्या आवारातून मोहोपाडा नविन पोसरी बाजारपेठेतून पुन्हा मोहोपाडा पोलीस चौकी अशी मिरवणूक फिरविण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आळी आंबिवली, मोहोपाडा व नवीन पोसरी येथील तरुणांनी अथक परिश्रम घेतले.दरम्यान, रसायनीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक व परिसरातील कार्यक्रम शांततेत पार पडले.कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बाळवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फुंडे हायस्कूलमध्ये शिवरायांना मानवंदना
उरण : रयत शिक्षण संस्थेचे फुंडे येथील तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात रविवारी (दि. 19) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्या सुनिता वर्तक, पर्यवेक्षक एस. जी. म्हात्रे, ज्युनिअर कॉलेज प्रमुख व्ही. के. कुटे, गुरुकुल आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख एच. एन. पाटील आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यालयातील सातवीचा विद्यार्थी सुमित बुरुंगले याने जोशपूर्ण आवाजात शिवगर्जना म्हटली. मृदुला म्हात्रे हिने महाराष्ट्र गीत सादर करून महाराजांना मानवंदना दिली. इयत्ता सातवी ’अ’ च्या विद्यार्थिनींनी शिवजन्माचा पाळणा सादर केला. तर अश्विनी कारंडे हिने शिवगीत सादर केले. आदित्य घुटुकडे याने पोवाडा सादर केला. तर प्रज्ञा मुंजे, स्नेहल शिंदे, प्रज्ञा शिंदे, धीरज मोरे या विद्यार्थ्यांनी भाषणातून शिवरायांचे बालपण, त्यांचे कार्य सांगितले. क्रिडा शिक्षक दिगंबर पाटील, प्राचार्या सुनिता वर्तक आदींची भाषणे या वेळी झाली. सूत्रसंचालन श्रावणी कोळी हिने केले. इयत्ता आठवी ’ब’ च्या वर्गाने वर्गशिक्षिका आर.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
वीर वाजेकर महाविद्यालयात व्याख्यान
उरण : वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 19) शिवजयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. तालुका विधी प्राधिकरण, विभाग पनवेल न्यायालय येथे झङत या पदावर कार्यरत असणारे शैलेश कोंडसकर हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष देसाई यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत गोतपागर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सेवक व राष्ट्रीय सेवा योजनेचे, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. राम गोसावी यांनी मानले.
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
पनवेल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्वाभिमान युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महापालिका, स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटना, गणेश नगर करंजाडे, रमाई नगर वडघर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना स्वाभिमान युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी उपस्थिती दर्शवून महाराजांना अभिवादन केले. दरम्यान, आगामी क्रांती दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या रायगड जिल्हा कार्यकारणीची बैठक जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे व कार्याध्यक्ष विजय धोत्रे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील दलित चळवळीतील सर्व लोक कलावंत तसेच आंबेडकर चळवळीत काम करणार्या सर्व प्रमुख नेत्यांचा सत्कार करण्याचा ठराव घेण्यात आला.
उरण महाविद्यालयात अभिवादन
उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड, अकाउंटन्सी विभाग प्रमुख के. ए. शामा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले. आयक्यूएसी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, ऑफिस सुप्रीटेंडंट तानाजी घ्यार, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केबीपी कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव सप्ताह
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन केले होते. शिवजन्मोत्सव सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविले गेले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी पारायण सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. तसेच स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, महिला संरक्षण प्रशिक्षण शिबीर, गड किल्ले संवर्धन (माहुली गड), कापडी पिशव्या वाटप असे निरनिराळे उपक्रम राबवण्यात आले. पारायण सोहळ्याचे औचित्य साधून विजयराव देशमुख लिखित ’शककर्ते शिवराय’ या पुस्तकाचे पारायण करण्यात आले. प्रातःकाली शिवज्योत महाविद्यालयात आणण्यात आली. प्रवक्ते सुदर्शन भोईर यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शुभदा नायक, उपप्राचार्य प्रा. सी.डी. भोसले, उपप्राचार्या डॉ. राजश्री घोरपडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी व चेअरमन डॉ. एल. व्ही. गवळी, डॉ. पी.जी. भाले व प्रा.एन. नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, अशी माहिती एन.एस.एस. युनीटचे स्वयंसेवक ओमकार गोळे आणि नेहा जांभळे यांनी दिली.
युईएस कॉलेजमध्ये पालखी मिरवणूक
उरण : युईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सिनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी पारंपरिक वेषभूषेत जमले होते. सिनियर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, सिनियर कॉलेजच्या एचओडी व माध्यमिक, प्राथमिक व पूर्व – प्राथमिक विभागातील सुपरवायझर्स, पीटीए मेंबर्स, पालकगण, स्कूल, ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे सर्व विद्यार्थी व शिक्षकगण उपस्थित होते. ढोलताशे व लेझिमच्या वादयवृंदासह महाराजांच्या पालखीची मिरवणूक उत्साहात झाली.