वांगणी हायस्कूलच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम
नागोठणे : प्रतिनिधी
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी घरी बसून कंटाळलेले असताना नागोठणे विभागातील वांगणी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांनी इपीएल-एक्सप्लोर, प्ले अॅण्ड लर्न म्हणजेच शोधा, खेळा आणि शिका हा अभिनव उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करुन त्यांच्यामध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केले.
या उपक्रमासाठी विज्ञान शिक्षक टिळक खाडे यांना बंगळुरू येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि या संस्थेच्या चिपळूण येथील स्थानिक समन्वयक नेहा लाड यांचे सहकार्य लाभले. मे आणि जून या दोन महिने चाललेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी व परिसरात सहज उपलब्ध असलेल्या माती, पाणी, भांडी, मेणबत्ती, माचिस, गवत, पाने, फुले, हार्डबोर्ड, पॅड, पुस्तके, मोजपट्टी, कागद, फुगे, बाटल्या, रंग, तेल, कुंडीतील रोपटे आदींचा वापर करून विविध वैज्ञानिक प्रयोग व प्रात्यक्षिके केली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मृदा व मृदेचे प्रकार, मृदेचा पिकांवर होणारा परिणाम, प्रकाश संश्लेषण, पानाचे कार्य, फुलाचे भाग, घर्षण बल व त्याचे दैनंदिन जीवनातील उपयोजन, चेतासंस्था व मेंदूतील भाग आणि त्याची कार्ये, पक्षी, त्यांची घरटी व स्थलांतर, उष्णता तसेच तापमान अशा विविध वैज्ञानिक संकल्पनासंदर्भात वेगवेगळे प्रयोग व प्रात्यक्षिके करुन विद्यार्थ्यांनी त्यांचे कुतूहल जागविले.
विविध वैज्ञानिक संकल्पनांची अनुभूती प्रत्यक्ष कृतीतून घेताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमात आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षणातील ज्ञानरचनावाद या शिक्षणपद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी या उपक्रमाच्या निमित्ताने वांगणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक टिळक खाडे यांनी केली. प्रत्येक आठवड्याला होणार्या साप्ताहिक ऑनलाईन प्रश्नमंजुषेद्वारे विद्यार्थ्यांनी त्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाची पडताळणीही करण्यात आली.