दोन्ही सरपंच एकमेकांच्या सहकार्याने करताहेत सामाजिक कार्य
चौक : रामप्रहर वृत्त
ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव व ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीवरील गटाराचे काम रायगड जिल्हा भाजप उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे व सरपंच रविन्द्र कुंभार यांच्या प्रयत्नाने होणार आहे.त्यामुळे हा परिसर दुर्गंध मुक्त होईल. चौक-लोहोप मार्गावरील चौक -तुपगाव हद्दीवरील असणार्या इमारतींचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. येथे गटाराचे नियोजन नसल्याने व ईमारत बांधकाम करताना योग्य नियोजना अभावी हे सांडपाणी रस्त्यावर व एका डबक्यात साठल्याने मोठी दुर्गंधी येत आहे, त्यातुनच डास आणि मच्छर होत असल्याने रोगराई पसरते आहे. याच ठिकाणी सुमारे 50 वर्षापासून डॉक्टर वाळिंबे यांचा दवाखाना असून,नेताजी पालकर भात गिरणी आहे,तर येथूनच विस्तारित गावठाण कडे जाणारा मार्ग आहे.ईमारती ग्रुप ग्रामपंचायत चौक हद्दीत असून सांड पाण्याचा होणारा निचरा तुपगाव हद्दीत होत आहे.या हद्दीच्या वादात येथील काम रखडल्याचे खात्रीपूर्वक समजते.तर ईमारत मालकाचा कोणताच अधिकृत परवाना नाही. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांची परवानगी नसून सार्वजणिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षाने अशी अवस्था निर्माण झाली आहे. याचा त्रास परिसरात राहणार्या लोकांना व या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना होत आहे.याबाबत डॉ.वाळिंबे व सिद्धी भात गिरणीचे संचालक नारायण पाटील यांनी रीतसर तक्रार दाखल केली होती.आज सकाळी जेसीबी च्या साहाय्याने माती व दुर्गंध पाण्याने भरलेले गटार उपसण्याचे काम सुरू केले आहे.सद्या तात्पुरत्या स्वरूपात हे काम सुरु असून पुन्हा त्यावर काही होऊ नये म्हणुन त्वरित कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सरपंच रितु ठोंबरे यांनी सांगितले. याची दखल घेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांनी तुपगावचे सरपंच रविन्द्र कुंभार यांच्या समवेत पाहणी केली. ग्रामस्थांच्या सूचना व प्रत्यक्ष पाहणीत वस्तुस्थिती कळल्यावर चौक सरपंच ठोंबरे व तुपगाव सरपंच कुंभार यांनी हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच हे काम सुरू होईल.