Breaking News

‘सीकेटी’च्या इंग्रजी माध्यमात मराठी राजभाषा दिन

पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी काढली ग्रंथ दिडी; कविताही सादर

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय, इंग्रजी माध्यमात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माता सरस्वती आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. विद्यालयाच्या गायक वृंदाने सुरेल स्वागतगीत सादर केले. प्रगती जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मराठी विषय शिक्षिका शशिकला पाटील यांनी अतिशय ओघवत्या भाषेत मराठी राजभाषा दिनाची महती सांगितली. या वेळी विद्यार्थ्यांनी कविवर्य मंगेश वाडगांवकर यांच्या कविता सादर केल्या. मराठी कथा वाचन केले तर काही विद्यार्थ्यांनी मराठी दिनाविषयीसमयोचित भाषण प्रस्तुत केले. विशेष पाहुण्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदच्या सदस्या जुईली अंतिथकर आणि संचारी आकरेकर यांनी कविता सादर केल्या. वैभव कानिटकर यांनी  मराठी भाषेची थोरवी वर्णन केली व स्वरचित कविता सादर केली. जितेंद्र लाड यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती सदस्या, झुनझुनवाला कॉलेजच्या प्राध्यापिका पाठयपुस्तक मंडळ निवड समिती सदस्या आणि विशेष तज्ञ प्रमुख पाहुण्या दीपा ठाणेकर यांनी मराठी ही अभिजात भाषा असून तिचा अभिमान आपल्याला असायलाच पाहिजे असेही सांगितले. मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात काढलेली ग्रंथ दिंडी ही कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या वेळी शिक्षकांनी, अबीर गुलाल उधळित रंग’ हा अभंग गाऊन विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली. आभार मानल्यानंतर वैभव कानिटकर यांनी कविवर्य कुसुमाग्रजांची कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply