चेन्नई : वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएलमध्येही अपवाद वगळता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. या सार्याचं श्रेय कर्णधार धोनीला दिलं जात असून, हे सर्व त्याला कसं जमतं असं कोडं क्रिकेटरसिकांना पडलं आहे, मात्र हे कोडं सुटण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण, ‘चेन्नई’च्या यशाचं गुपित मी निवृत्त झाल्यानंतर सांगेन,’ असं धोनीनं म्हटलं आहे.
आयपीएलच्या पहिल्या सीझनपासूनच चेन्नई सुपर किंग्जकडे एक तगडा संघ म्हणून पाहिलं जातं. चेन्नईच्या संघाने तीनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, तर सात वेळा अंतिम फेरी गाठली आहे. दोन वर्ष चेन्नईच्या संघाला आयपीएलमधून बाहेर ठेवण्यात आलं होतं. असं असूनही चेन्नईचा सक्सेस रेट आयपीएलच्या इतर कोणत्याही टीमहून अधिक आहे. तेव्हा चेन्नईच्या यशाचं रहस्य काय, असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला ‘चेन्नईचा सक्सेस मंत्र मी निवृत्त झाल्यावरच सांगणार आहे. तोपर्यंत मी त्याबाबत काहीही वक्तव्य करणार नाही. कारण मी हा मंत्र सांगितला, तर इतर संघ त्याचा फायदा घेतील.’