Breaking News

स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून शासनाचे लक्ष वेधले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले की, राज्यात कोरोनाच्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परीक्षा देणार्‍या उमेदवारांना वयोमर्यादितील सवलतींचा कालावधी वाढवून देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी डिसेंबर 2022मध्ये मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेल्यामुळे स्पर्धा परिक्षेस बसण्याची त्यांची संधी हुकली असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तसेच कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरळसेवा परीक्षेस बसण्याची संधी मिळण्यासाठी वयोमर्यादेतील सवलतीचा कालावधी वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा या तारांकित प्रश्नात केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तरात सांगितले की, कोरोना कालावधीत पद भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 17.12.2021च्या शासन निर्णयाद्वारे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परिक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून डिसेंबर 2021 ते 2022 या कालावधीत प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातींच्या अनुषंगाने परीक्षेला बसण्याची मुभा दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी 2022पासून डिसेंबर 2022 अखेरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 19145 इतक्या पदांकरिता 128 जाहिराती देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन 2016पासून दरवर्षी प्रसिद्ध होणार्‍या जाहिरातींच्या सरासरी संख्येच्या तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे.
जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 अखेरपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सदर जाहिरातींच्या अनुषंगाने होणार्‍या परीक्षांना बसण्याची अतिरिक्त संधी कोविड कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना तरतुदीनुसार उपलब्ध झाली आहे. कोविड कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची स्पर्धा परीक्षांना बसण्याची संधी हुकली आहे, अशी वस्तूस्थिती नाही, असे उत्तरात म्हंटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply