Breaking News

तमिळ थलायव्हाजने यूपी योद्धाला बरोबरीत रोखले

पाटणा : वृत्तसंस्था

पाटण्याच्या पाटलीपुत्र बंदिस्त स्टेडियममध्ये बुधवारी (दि. 7) झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या सामन्यात अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या तमिळ थलायव्हाजने दडपणाच्या परिस्थितीत कामगिरी उंचावून यूपी योद्धाला 28-28 असे बरोबरीत रोखले. दुसर्‍या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव केला.

रिशांक देवाडिगाच्या (5 गुण) दमदार चढायांच्या बळावर यूपीने मध्यंतराला 16-11 अशी पाच गुणांची आघाडी घेतली होती, परंतु दुसर्‍या सत्रात थलायव्हाजने झोकात पुनरागमन केले. राहुल चौधरी आणि शब्बीर बापू यांनी प्रत्येकी चढायांचे पाच गुण मिळवले, तर मनजित चिल्लरने पकडींचे चार गुण मिळवत थलायव्हाजसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यूपीकडे 28-27 अशी आघाडी असताना सामन्याच्या अखेरच्या चढाईत अजय ठाकूरने नितेश कुमारला बाद करून थलायव्हाजला बरोबरी साधून दिली. यूपीचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा सामना बरोबरीत सुटला.

दुसर्‍या सामन्यात प्रदीपने चढायांचे 14 गुण मिळवूनही पाटणाला पराभव पत्करावा लागला. हरियाणाकडून विकास हुडाने यंदाच्या हंगामात दुसर्‍यांदा 10 गुण मिळवण्याची किमया साधली. त्याला रवी कुमारच्या बचावाची (4 गुण) सुरेख साथ लाभली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply