लहान मुलगा व ज्येष्ठ नागरिकाला घेतला चावा
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत शहरात माकडांनी आबालवृद्धांना लक्ष्य केले असून ही माकडे माणसांच्या अंगावर धावून चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वन खात्याने व नगर परिषद प्रशासनाने या माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
सुरुवातीला एक माकड कर्जत शहरात आले. ते शहरभर भटकत असे, परंतु त्याचा कुणाला त्रास नव्हता. इमारतींच्या गच्चीवर किंवा गॅलरीत ते वावरत असे. अनेक जण त्याला खायला देत असत, मात्र गेल्या काही दिवसांपासून आणखी काही माकडे शहरात आली आणि त्यांनी आपले कारनामे सुरू केले आहेत. एका बालकाच्या अंगावर जाऊन त्याच्या डोक्याचा चावा घेऊन त्याला माकडाने जखमी केले तसेच महावीर पेठेत मुकुंद मेढी या 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर धावून जाऊन त्यांचाही चावा घेतला.
माकडांच्या दहशतीमुळे लहान मुले, महिला, ज्येेष्ठ नागरिक, व्यापारी, फेरीवाले तसेच नोकरीसाठी मुंबई, पुण्याकडे जाणार्या-येणार्या प्रवासी व चाकरमान्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या माकडांना पकडण्यासाठी बदलापूर वन विभागाकडून कर्मचार्यांचे एक पथक आले आहे. ते उपद्रवी माकडांचा शोध घेत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.