तातडीने कारवाई करण्याचे विधानसभा अध्यक्षांकडून निर्देश
पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोच्या जागेवर बेकायदेशीर कंटेनरयार्ड चालवणार्या भूमाफियावर कारवाई करा, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी शुक्रवारी (दि. 24) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली. त्या अनुषंगाने विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सिडकोला दिले.
सिडकोने संपादन केलेल्या जागेवर भूमाफिया बेकायदेशीर कंटेनर यार्ड चालवत असून या प्रकरणी तेथील ग्रामपंचायत सदस्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत त्यांनी नवी मुंबई पोलिसांना पत्र पाठवले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी त्याचा पूर्ण तपास करून सिडको व्यवस्थापकीय संचालकांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले, मात्र सिडको याबाबत टाळाटाळ करत आहे. यामुळे शासनाने व्यवस्थापकीय संचालकांना निर्देश देऊन पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार कारवाई करावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी सभागृहात केली. या महत्वपूर्ण विषयाची दखल घेत विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी शासनाने त्वरित नोंद घेऊन सिडकोच्या महाव्यवस्थापकांना संबंधित अधिकार्यांना योग्य ते आदेश देण्याचे निर्देश दिले.