Breaking News

मुबलक पाण्यासाठी नियोजनाची गरज

रोहा तालुक्यात पाणी प्रश्न ऐरणीवर

रोहे : प्रतिनिधी
उन्हाळा आला की पाणीटंचाई या विषयावर चर्चा चालू होते, परंतु भविष्यातील पाणीटंचाई बाबत कोणतीही चर्चा होताना दिसत नाही. मुबलक पाणीसाठा असताना तो जतन करणे, पाणी आडवणे व जिरवणे याबाबत खल होताना दिसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती रोहा तालुक्यातील आहे. रोहा तालुक्यात उपलब्ध असलेला अथवा उपलब्ध होत असलेला पाणीसाठा कशा पद्धतीने जतन करता येईल यावर चर्चा होताना दिसत नाही. पाणी जतन करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे भविष्यातील मुबलक पाण्यासाठी नियोजनाची गरज आहे; अन्यथा कोकणात दुष्काळ पाहण्यास मिळेल. बारमाही वाहणारी कुंडलिका नदी, धो धो कोसळणारा पाऊस असे चित्र असताना तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील काही भागात उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. आज पाण्याची अवस्था अशी असेल तर भविष्यात भयानक परिस्थिती उद्भवू शकते. तालुक्यात मुबलक पाणी असताना प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार व लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे तालुक्यात पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात उद्भवत आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून शासन व लोकप्रतिनिधींनी एकत्रित काम
करून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. रोहा तालुक्यात पाण्याचे स्त्रोत मुबलक आहेत, पण त्याचा उपयोग होताना दिसत नाही. तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो.सुतारवाडीचे धरण वगळता अन्य ठिकाणी पाणी साठविण्याची व्यवस्था नाही. म्हासाडी धरणाच्या रुपाने चणेरा विभागात पाण्याची व्यवस्था होऊ शकली असती, पण भूमिपूजन होऊनही एकही दगड संभवित धरणाच्या पायाला लावला गेला नाही. मध्यंतरीच्या काळात वनखाते व कृषी खात्याच्या माध्यमातून पाणी साठविण्यासाठी बंधारे बांधण्यात आले, परंतु गाळ काढण्यासाठी निधी नसल्याने हे छोटे बंधारे गाळात रुतले आहेत. दुसरीकडे लोकसहभागातून पाणी अडविण्यासाठी मोहीम हाती घेत बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे आज दुर्लक्षित झाले आहेत. वाशी, लांडर, तळाघर, बोरघर, निवी, वर्षे भुवनेश्वर, रोहा नगर परिषद यांना कारीवणे येथून पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. कारीवणे येथे बंधारे बांधण्यात आले. जलपूजन करण्यात आले. पुढे काय हा प्रश्न अद्याप सुटला नाही. पूर्वी भुवनेश्वरच्या माथ्यावरुन पाणी भुवनेश्वरवासीयांना मिळत होते. कालांतराने या स्रोताकडे दुर्लक्ष झाले. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही स्त्रोतांचे पाणी मोफत मिळणार होते, परंतु लोकप्रतिनिधींची अनास्था पहावयास मिळाली. तालुक्यात पाण्यासाठी कुंडलिका नदी सर्वांत मोठा पाण्याचा स्त्रोत होता. निती आयोगानेसुद्धा कुंडलिका नदीची दखल घेतली होती. आज ही नदी एमआयडीसीतील सांडपाणी, नगर परिषद ते ग्रामपंचायतीमधील सांडपाण्यामुळे प्रदुषित झाली आहे. यावर स्थानिक लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. पाण्यासाठी सर्वांत जास्त त्रास पडम ते दापोली या गावांतील नागरिकांना उन्हाळ्यात होतो. त्यांना तात्पुरते पर्याय नको, तर कायमस्वरुपी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. तालुक्यातील शहर व गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व स्त्रोत यांचा अभ्यास केल्यास लोकप्रतिनिधी व शासनाशी नागरिकांच्या व तज्ज्ञ लोकांच्या सहकार्याने ठोस नियोजन करण्याची आवश्यकता आहे. रोहा पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात संभाव्य पाणीटंचाई भासू शकेल अशा गावांचा आराखडा तयार केला जातो, पण पाणी जतन करण्यासाठी शासनाकडे कोणताही पाठपुरावा केला जात नाही हे वास्तव आहे.

कालव्याला पाणी नाही
पूर्वी कालवे प्रवाहित असल्याने वापरण्यास कालव्यांचे पाणी मिळत होते. महत्वाचे म्हणजे गावातील विहिरी व तलाव पाण्याने भरत असत, पण आता कालवा कोरडा आहेच, शिवाय गावात विहिरी, तलावही दिसत नाहीत. शहरातील बहुतांशी विहीरी वाढत्या नागरीकरणाने लोप पावत आहेत. या वर्षी कालव्यातील पाणी येण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलने केली, निवेदन दिले, मात्र मार्च महिना संपत असतानाही अद्याप कालव्याला पाणी आले नाही. कालव्याचे काम मात्र युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येते.

Check Also

गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Leave a Reply