उरण : बातमीदार : जेएनपीटी बंदराच्या जेट्टीवर बधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रेलर चालकासह खोल समद्रात बुडाला होता. त्याचा मृतदेह आज शुक्रवारी दुपारनंतर काढण्यात यश आले. या अपघातानंतर जेएनपीटी बंदराकडे समुद्रातून काढण्यासाठीची कोणतीही सुविधा नसल्याने दुसर्या दिवशी बुधवारी नेव्हीच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही दीड दिवसांच्या अथांग प्रयत्नानंतर शुक्रवारी दुपारी चालक जॅकी कुमार याचा मृतदेह काढण्यात यश आले.
बुधवारी रात्री 11च्या सुमारास जेडब्ल्यूसी लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीचा ट्रेलर नंबर एमएच 46 एफ 1526 हा जेट्टीवरील समुद्र किनार्याची भिंत तोडून 50 फूट खोल समुद्रात कोसळून चालकाला जलसमाधी मिळाली. घटनेनंतर जेएनपीटी प्रशासनाकडे अद्ययावत यंत्रणा नसल्यामुळे व काळोख असल्याने दुसर्या दिवशी गुरुवारी सकाळी इंडियन नेव्हीला पाचारण करण्यात आले. त्यांनी सकाळपासून शोधाशोध सुरू केली. त्यांनाही गुरुवारी काही हाती लागले नाही. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधाशोध सुरू केल्यानंतर दुपारच्या सुमारास चालक जॅकी कुमार याचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून तो उरणमधील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पीएम करण्यासाठी आणण्यात आला. मयत चालकाचे नाव जॅकी शर्मा (23) असून तो जेडब्ल्यूसी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला होता. ट्रेलरही कंपनीच्या मालकीचा होता. सदर अपघात कशामुळे याचे निश्चित कारण समजले नाही. सदर अपघातात मृत्यू झालेल्या चालक जॅकी शर्माच्या परिवाराला आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. जेडब्ल्यूसी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मॅनेजर मनोज शर्मा यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने आर्थिक मदतीचे आश्वासन दिले असले, तरी ती मिळण्याची शक्यता नाही, कारण यापूर्वी झालेल्या अपघातात फक्त अशीच आश्वासने कंपनी प्रशासन देत आली असल्याची माहिती कंपनीत काम करणार्या काही कामगारांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.