पोल्ट्रीतील शिल्लक कचर्याची विल्हेवाट
खोपोली ः प्रतिनिधी
महड अष्टविनायक तीर्थक्षेञ परिसराचे पावित्र्यला धक्का लावण्याचे उद्योग काही जणांकडून सुरू असून, पोल्ट्रीमधील शिल्लक कचरा गोणी भरून उघड्यावर टाकण्यात येत आहे. त्यामुळे सुमारे तीन ते चार किमी परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महड नदिकिनारी बेकायदेशीरपणे मेलेल्या कोंबड्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागेचा वापर करणार्या अनोळखी व्यक्तीविरोधात दोन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस या प्रकाराला आळा बसला होता, परंतु पुन्हा महड भागात नदीकिनारी मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीतील कचरा व मेलेल्या कोंबडीचे मांस गोणीत भरून टाकले जात आहे. यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. याठिकाणी पाताळगंगा नदी वाहत असून नदीवर अनेक गावाच्या पेयजल योजना आहेत. त्यामुळे झपाट्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वेळी अवेळी पिकअपमधून घाण आणली जाते. कच्चा रस्ताने गाडी जावून कचरा टाकला जातो. महडमधील जागरुक नागरिकांनी दोन वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी पिकअप जीप अडवून जाब विचारला होता.
-शितल वाघरे, खालापूर