Breaking News

पनवेल महापालिकेचे आर्थिक नुकसान करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता करामध्ये दिलासा देण्यासाठी कायद्यात काही बदल करावा लागला तरी तो करून पनवेलकरांना मदत करावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दुसरीकडे मात्र माजी नगरसेविका लीना गरड आणि खारघर फेडरेशनचे सेक्रेटरी एस. एच. कलावत यांनी नागरिकांची दिशाभूल केली. त्यांच्यामुळे पालिकेबरोबरच मालमत्ताधारकांचे आर्थिक नुकसान झाल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पनवेल महापालिकेकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील विशेषतः सिडको वसाहतीमधील मालमत्ता कराच्या तिढ्याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याआधी लक्ष वेधले होते. एकूण मालमत्ता करामध्ये नागरिकांना दिलासा देण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी केली आहे. याबाबत सरकार नक्कीच सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर महापालिकेच्या हद्दीमध्ये विकासकामांना सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा वगळता सर्व सेवांचे हस्तांतरण झाल्यानंतर सर्व सेवांचा दर्जा सुधारल्याचे आढळून येईल. पूर्वीच्या पनवेल महानगरपालिका झाल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वडाळे तलाव व अन्य अनेक महत्त्वांच्या ठिकाणांचा कायापालट झाला आहे. महापालिका हद्दीतील समाविष्ट सर्व गावांमध्ये पायाभूत सुविधांच्या कामांना प्रारंभ झाला आहे.
प्रशासनाने पालिका क्षेत्राचे स्मार्ट सिटीत रूपांतर व्हावे याकरीता पाऊले उचलली आहेत. रस्ते, ड्रेनेच वॉटरची व्यवस्था, इमारतींचे योग्य नियोजन, खेळाची मैदाने, नागरिकांची पाण्याची गरज ओळखून नव्याने पाईपलाईन टाकणे, नवीन जलकुंभाची जागा निश्चित करणे, आवश्यक त्या ठिकाणी वॉटर पंपाची जागा सूचवणे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुढील 50 वर्षांचे नियोजन करून नवीन धरणासाठी जागा सूचवणे, कचरा वर्गीकरण करण्याबाबत नवीन उपाययोजना, नवीन शौचालयाच्या जागा निश्चित, पालिका क्षेत्रात शोभेच्या बेटांची जागा त्याचप्रमाणे शहरातील विकासाविषयी आराखडा बनवणे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गावठाणाबरोबरच संपूर्ण पालिका क्षेत्राचा आता खर्‍या अर्थाने विकास होणार आहे, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply