Friday , September 22 2023

सायन-पनवेल महामार्गावर ड्राय रन सुरू

कामामुळे वाहतुकीत बदल
नवी मुंबई ः बातमीदार
सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ एलपी उड्डाणपुलावर काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नवी मुंबई वाहतूक पोसिसाकडून शनिवारी (दि. 22) ड्राय रन घेण्यात आले. या मार्गावरील पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर पुढील एक महिना एकच मार्गीका खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हलक्या वाहनांनी पामबीच मार्गाचा वापर करावा, असे आव्हान नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
भरधाव वेग आणि सर्वात व्यस्त म्हणून सायन-पनवेल महामार्गाची ओळख आहे. त्यामुळे या मार्गावर रोजच लाखो वाहनांची वर्दळ असते. मुंबई, ठाण्याकडून पुणे, सातारा, कोल्हापूर, बँगलोरला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर अधिक होतो. येथील वाहतूक वर्दळ पाहता रस्त्यावर पडणारे खड्डेदेखील तितकेच मोठे असतात. या खड्ड्यातून कायमची मुक्तता व्हावी यासाठी नेरूळ एलपी उड्डाण पुलावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम शनिवारपासून पुढील एक महिना चालणार आहे. त्यासाठी पुण्याकडे जाणार्‍या दोन मार्गिका बंद करण्यात आल्या असून एक मार्गिका खुली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येथील वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पुण्याकडे जाणार्‍या हलक्या वाहनांनी पामबीच मार्गाचा वापर करावा तसेच जड वाहन चालकांनी शक्य होईल तितके या मार्गावरून जाण्याचे टाळावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

एलपी ब्रिजच्या काँक्रीटीकरणचे काम हाती घेण्यात आले असून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई, ठाणे दिशेने पुण्याकडे जाणारी वाहने शिरवणे एमआयडीसी सर्व्हिस रोडवरून खिंडीमार्गे वळवण्यात आली आहेत. शिरवने जंक्शन, एलपी जंक्शन येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून एकूण चार अधिकारी, 21 पोलीस तीन शिफ्टमध्ये तर ठेकेदाराने प्रत्येकी 20-20 वार्डन दोन शिफ्टमध्ये असणार आहेत. शनिवारी 24 तासासाठी ड्राय रन घेणार असून वाहतूक कशी सुरळीत होईल याचे नियोजन काम सुरू करण्यापूर्वी करणार आहोत.
-नितीन गीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुर्भे वाहतूक शाखा

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply