पनवेल : वार्ताहर
खारघरमधील कोपरा गावात बेकायदा वास्तव्यास असलेल्या दोन बांग्लादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाच्या नवी मुंबई युनिटने अटक केली. दोघेही मागील 19 ते 20 वर्षांपासून खारघर भागात राहत असल्याचे उघडकीस आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाने या दोघा बांग्लादेशी नागरिकांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मूळचा बांगलादेशी असलेल्या मोहम्मद खैरुल इस्लाम अक्षीर शेख याला पश्चिम बंगाल पोलिसांनी गत मार्चमध्ये मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सहभाग असल्याच्या कारणावरून अटक केली होती. पोलीस चौकशीत तो खारघरमधील कोपरा गावात राहणार्या कबीर शेखच्या संपर्कात असल्याची माहिती पश्चिम बंगाल पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कबीर आलम शेख (वय 31) व शरीफ शफिकुल शेख (वय 23) हे दोघेही खारघरमध्ये अवैधरीत्या राहत असल्याची माहिती दशतवादविरोधी पथकाला मिळाली. पथकाच्या नवी मुंबई युनिटने या दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी आई-वडिलांसह घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे तसेच दोघेही मागील 19 ते 20 वर्षांपासून खारघर येथील कोपरा गावात राहत असल्याचे चौकशीत आढळून आले. त्यानुसार पथकाने या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …