नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. चीनपाठोपाठ इटलीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. अशातच इटलीतील फुटबॉल लीग सेरी-एच्या 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती आणि त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
इटलीतील लीग स्पर्धेत 20 संघ खेळतात. या स्पर्धेतील 11 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीच्या आरोग्य विभागाने नवे आदेश काढले असून सर्व खेळाडूंना सराव करण्यापासून बंदी करण्यात आली आहे, तसेच घरी राहण्याचे आदेश दिले आहेत.
सीरी-एच्या डॉक्टरांनी स्पर्धेतील सर्व सराव सत्र रद्द करण्यास सांगितले. अन्य खेळाडूंना कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली. लीगमध्ये खेळणार्या यूसी सांपडोरिया क्लबच्या सात खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर फिओरेंटीनाच्या चार खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली.