नाकावाटे घेतली जाणारी लस आरोग्य केंद्रांवर उपलब्ध
पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्कोव्हॅक लस महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रावरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. इन्कोव्हॅक लसीकरण शनिवार (दि.29) पासून पनवेल महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांवर सुरू करण्यात आले आहे.
60 वर्षांवरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन सहा महिने झाले आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनाच मिळणार असल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आंनद गोसावी यांनी दिली आहे. ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे. या लसीसाठी पूर्वीप्रमाणेच आधी कोविन पवरती नोंदणी करावी लागणार आहे. महापालिकेच्या नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी 20 डोस व 4 आरोग्य वर्धिनी उपकेंद्रासाठी प्रत्येकी 10 डोस शासनाकडून पुरविण्यात आले आहे. मार्च 2020 मध्ये पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला. कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य यंत्रणांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी 16 जानेवारी 2021पासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली.
दुसर्या डोसचे 102 टक्के लसीकरण पूर्ण
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर, अत्यावश्यक सेवा बजावणार्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली, तर 1 मे 2021 पासून 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. महापालिकेने आत्तापर्यंत पहिल्या डोसचे 109 टक्के, दुसर्या डोसचे 102 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.