कर्जत : प्रतिनिधी
मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण म्हणजे गुढीपाडव्या निमित्त कर्जत मधील अनेक संस्था एकत्र येऊन कर्जत शहरात शनिवारी (दि.6) मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
कपालेश्वर देवस्थान समिती, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, संस्कार भरती, मार्तंड ढोल ताशा पथक, शिवतांडव ढोल ताशा पथक, वारकरी सांप्रदाय, विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम आदींनी एकत्र येऊन स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. टिळक चौकातून या स्वागतयात्रेचा शुभारंभ कपालेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष हेमंत डोंबे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या शोभायात्रेत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, माजी नगराध्यक्ष वसंत भोईर, राजेश लाड, वनिता म्हसे, नगरसेवक बळवंत घुमरे, देवस्थान समितीचे पद्माकर गांगल, ज्ञानेश्वर तिवाटणे, अभिजित मराठे, राजाभाऊ कोठारी, महेंद्र चंदन, दीपक बेहेरे, दिनेश रणदिवे, राहुल वैद्य, दिलीप राणे, निवृत्ती शिंदे, साईनाथ श्रीखंडे, भालचंद्र जोशी, दीपक वैद्य, सुरेखा शितोळे, वैदेही पुरोहित, मीना प्रभावळकर आदीं सह कर्जतकर मोठ्या संखेने उपस्थित होते.
ही स्वागत यात्रा कर्जत शहरातील महावीर पेठ, डेक्कन जिमखाना, पाटील आळी, खाटीक आळी मार्गे पुन्हा टिळक चौकात आली आणि तेथे सांगता करण्यात आली. या स्वागत यात्रेत ढोल पथकांनी उपस्थितांचे मन जिंकले. विशेषतः महिलांनी ढोल वाजवून आपली चमक दाखवून दिली तर वारकरी सांप्रदायने भजने गाऊन जुनी परंपरा चालू ठेवली. गावा गावात घरो घरी गुढ्या उभारून नव वर्षाचे स्वागत करण्यात आले.